Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशआता..शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा पुतळा

आता..शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा पुतळा

उत्तर प्रदेश – योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना आखतंय. ‘नव्य अयोध्या’ या योजनेंतर्गत सरकार हा भव्य पुतळा प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करत आहे. शरयू नदीच्या काठावर रामाचा एक भव्य पुतळा उभारण्यासाठीचा प्रस्ताव योगी सरकारनं राज्यपाल राम नाईक यांच्याकडे पाठवला आहे. पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी या प्रस्तावाचं प्रेझेंटेशन दिलं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रामाच्या या भव्य पुतळ्याची उंची १०० मीटरच्या घरात राहण्याची शक्यता आहे. परंतु राज्यपाल राम नाईक यांनी अद्याप या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलेला नाही. उत्तर प्रदेश राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये १८ ऑक्टोबरच्या दिवाळी सोहळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दीपावलीच्या निमित्तानं १,७१,००० दीप प्रज्वलितही करण्यात येणार आहे.

या दीपावलीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अलफोन्स आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा उपस्थिती दर्शविणार आहेत. मात्र हा भव्य पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या परवानगीचीही आवश्यकता आहे. अयोध्येचा विकास करण्यासंदर्भातील प्रकल्पाचा 195.89 कोटींचा आराखडा योगी सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. ज्यापैकी १३३.७० कोटींचा निधी केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला सुपूर्दही केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने नवा वाद उफाळून आला होता. पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल हा सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

उत्तर प्रदेश सरकारने नव्या पर्यटनस्थळांमध्ये गोरखधाम मंदिराचा समावेश केला आहे. त्यात मंदिराचे छायाचित्र, त्याचे महत्त्व, इतिहास ही माहिती आहे. या पुस्तिकेचे पहिले पान वाराणसी येथील गंगा आरतीला समर्पित करण्यात आले आहे. पुस्तिकेत पर्यटन विकास योजनाची माहिती आहे. पहिल्या पानाबरोबरच सहावे आणि सातवे पानही गंगा आरतीला समर्पित केले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले नव्हते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments