किंगफिशर एअरलाइन्स प्रकरणात माल्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट!

- Advertisement -

नवी दिल्ली- बँकांचे हजार कोटी बुडवून फरार झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्याविरोधात पुन्हा एकदा अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. बंगळुरूतल्या एका विशेष न्यायालयानं विजय माल्यासह १८ लोकांना अटक वॉरंट बजावलं आहे.

विजय माल्यानं फसवणूक केल्याची तक्रार एसएफआयओनं केली होती. त्यानंतर चौकशी केली असता, किंगफिशर एअरलाइन्सच्या संबंधित प्रकरणात अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाच्या एका दस्तावेजानुसार, कंपनी कायद्यांतर्गत विजय माल्या आणि १८ लोकांविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून गेलेल्या विजय माल्याने बँकांसोबत सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली होती. ट्विट करून त्याने बँकांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. सार्वजनिक बँकांमध्ये एकाच वेळी सर्व कर्ज फेडण्याची तरतूद आहे. शेकडो कर्जदारांनी या नियमांतर्गत कर्ज फेडले आहे. मग मला असं करण्यापासून का रोखलं जात आहे, असा सवाल त्यांनी विचारला होता.

या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणीही माल्याने केली. याशिवाय त्यांनी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयात रोहतगी यांनी नोंदवलेल्या सर्व जबाबावरून ते माझ्याविरोधात आहेत हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले होते. आमच्या प्रस्तावावर विचार न करता तो फेटाळण्यात आला, मी योग्य पद्धतीने चर्चा करण्यास तयार आहे असं ट्विट माल्याने केलं होतं.

- Advertisement -

विजय माल्याच्या बुडीत कर्ज प्रकरणात सीबीआयनं किंगफिशरचे ४ अधिकारी आणि आयडीबीआय बँकेच्या चार माजी अधिका-यांना अटक केली होती. विशेष म्हणजे अटक झालेल्यांमध्ये आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांचाही समावेश होता. किंगफिशरचे माजी व्यवस्थापकीय संचालक योगेश अग्रवाल आणि आयडीबीआय बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक बी. के. बत्रा यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘पीटीआय’ने दिली होती.

- Advertisement -