निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याने ‘चिनी ड्रॅगन’चा जळफळाट

- Advertisement -

दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. सीतारामन यांनी वादग्रस्त भागात केलेला दौरा शांततेसाठी अनुकूल नसल्याचे चीनने म्हटले. सीतारामन यांनी रविवारी चिनी सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील सुदूर अंजा जिल्ह्याचा दौरा केला. संरक्षण सिद्धतेचा आढावा घेण्याच्या उद्देशाने हा दौरा करण्यात आला.

चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. ‘भारतीय संरक्षण मंत्र्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याबद्दल चीनची भूमिका अतिशय स्पष्ट आहे,’ असे चुनयिंग यांनी म्हटले. ‘अरुणाचल प्रदेशाचा सीमावर्ती भाग वादग्रस्त आहे. त्यामुळे या भागात भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेला दौरा हा शांततेसाठी अनुकूल नाही,’ असे चुनयिंग यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.

- Advertisement -

यावेळी चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताला संवादाच्या माध्यमातून सीमाप्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. ‘भारताने चीनसोबत संवाद कायम ठेवायला हवा. याच माध्यमातून हा प्रश्न सोडवता येऊ शकेल. दोन्ही देशांमध्ये संवादासाठी योग्य वातावरणदेखील आवश्यक आहे,’ अशा शब्दांमध्ये चीनने सीतारामन यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला. ‘चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी भारत चीनसोबत प्रयत्न करेल, अशी आशा आहे. यामधून दोन्ही देशांसाठी समाधानकारक असणारा तोडगा निघेल,’ असेही चुनयिंग म्हणाले.

अरुणाचल प्रदेश तिबेटचा भाग असल्याचा चीनचा जुना दावा आहे. या भागातील भारतीय अधिकाऱ्यांकडे चीनकडून अनेकदा आक्षेपदेखील नोंदवण्यात आला आहे. भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक नियंत्रण रेषा ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीची आहे. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशाच्या विशेष प्रतिनिधींनी १९ वेळा संवाद साधला आहे. गेल्याच महिन्यात संरक्षण मंत्री सीतारामन सिक्कीमच्या सीमेवर असणाऱ्या नाथू ला येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी सीमेपलीकडे असलेल्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या सैनिकांना अभिवादन केले होते.

- Advertisement -