निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव: काँग्रेस

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर करताना गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मात्र जाहीर न केल्याने त्यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगावर भाजपचा दबाब आहे आणि त्यामुळेच गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. हे मूलभूत अधिकारांचं हनन आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गुजरात निवडणुकीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला. गुजरात दंगल झाली त्यावर्षीचा अपवाद वगळता गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यात आलेल्या आहेत. १९९८, २००७ आणि २०१२ मध्ये दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा एकाचवेळी करण्यात आली. मग यावेळी गुजरात निवडणुकीच्या तारखांची घोषणा लांबणीवर का टाकण्यात आली?, असा सवाल सिंघवी यांनी केला.

सध्या चेहऱ्यानुसार नियम बदलत आहेत. भाजपच्या बुडत्या नौकेला निवडणूक आयोग काडीचा आधार देऊन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोलाही सिंघवी यांनी लगावला.

- Advertisement -
- Advertisement -