माझ्यावर पाळत ठेवायला मी काय गुन्हेगार आहे का?

- Advertisement -

अहमदाबाद: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर पाळत ठेवल्या जात आहे. मी हॉटेलमध्ये उतरलो तरी सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्याची पडताळणी केली जाते. त्यांना मला रोख रकमेसहीत पकडायचे आहे. असं का केलं जात आहे? गुजरात हे प्रजासत्ताक भारतातील नेत्यांवर पाळत ठेवणारे राज्य आहे काय?, असा सवाल पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला.

‘अहमदाबाद मिरर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हार्दिक पटेल यांनी हा सवाल केला. हार्दिक पटेल म्हणाले की, मी अहमदाबाद एअरपोर्ट सर्कलच्या हॉटेलमधून बाहेर पडताच सात सेकंदात गुजरात सरकारच्या गुप्तचर विभागाने माझ्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज लिक केले. मी लोकशाही भारतात राहतो. ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. मी जनतेचा आवाज बुलंद करणारा नेता आहे. मी काही गुन्हेगार नाही. मला लोकांना भेटण्याचा अधिकार आहे आणि तो मला हवा आहे. मात्र व्हीआयपींवर नजर ठेवण्याची ही नित्याची बाब असल्याचं सांगून गुजरात सरकार या प्रकाराचं समर्थन करत आहे. हे योग्य नाही.

जर सुरक्षेच्या कारणास्तव आमच्यावर नजर ठेवल्या जाते तर मग सीसीटीव्ही फुटेज लिक करणे हा सुरक्षेचा भंग नाही का? असा माझा साधा सवाल आहे. आज गुजरातचे उपमुख्यमंत्री माझी पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदशी तुलना करत आहेत. मी काही गुन्हेगार नाही. मी केवळ काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि मला त्याचं उत्तर हवं आहे, असं ते म्हणाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी मला हॉटेलमध्ये आमंत्रण दिलं होतं. ती काही मोठी डिल नव्हती. मी जेंव्हा हॉटेलमध्ये पोहचलो तेव्हा रात्री तिथे थांबावे लागेल असं मला वाटलं नव्हतं. मी कपडे न बदलता तिथे गेलो होतो. नंतर काही मित्र माझ्यासाठी कपडे घेऊन आले होते, असंही ते म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -