मोदींचे हात छाटणारेही देशात आहेत: राबडीदेवी

- Advertisement -

पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचे हात छाटून टाकण्याची धमकी देणारे भाजप खासदार नित्यानंद राय यांना बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हिंमत असेल तर आमचे हात कापून दाखवा,’ असं आव्हानच राबडीदेवींनी दिलं आहे. इतकंच नव्हे, ‘मोदींचे हात कापणारे आणि गळा चिरणारे अनेक लोक या देशात आहेत,’ असंही त्यांनी सुनावलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाटणा येथील एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार नित्यानंद राय यांनी मोदींच्या विरोधकांचे हात छाटण्याची धमकी दिली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राबडीदेवी बोलत होत्या. राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदी लालूप्रसाद यादव यांची दहाव्यांदा निवड झाली आहे. या निवडीसाठी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘भाजपवाले हात कापायच्या धमक्या देताहेत. कापून तर दाखवा. देशातील आणि बिहारमधील लोक गप्प बसतील का? मोदींचे हात आणि गळा चिरणारेही देशात खूप आहेत,’ असं त्या म्हणाल्या.
ईडी आणि सीबीआयकडून सुरू असलेल्या यादव कुटुंबाच्या चौकशीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. ‘आमच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयकडून आलेल्या नोटिसांना उत्तर देणार नाही. तुम्ही कितीही नोटिसा पाठवा. आम्ही चौकशीसाठी कुठंही जाणार नाही. चौकशी करायची असेल तर ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आमच्या घरी यावं, असं त्यांनी ठणकावलं. या सर्व तपास संस्थांचा कारभार कसा चालतो हे मला चांगलं माहीत आहे,’ असंही राबडी म्हणाल्या.

- Advertisement -