Friday, March 29, 2024
Homeदेशएअर इंडियाला परकीय गुंतवणुकीचा टेकु!

एअर इंडियाला परकीय गुंतवणुकीचा टेकु!

महत्वाचे
१.एअर इंडियात परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के असेल २. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ३. एअर इंडियाने आत्तापर्यंत तीन वेळा कर्ज उभारले


नवी दिल्ली डबघाईला आलेल्या एअर इंडियाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मंजुरी दिली असून सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंगमध्येही १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली.

एअर इंडिया देशातील एकमेव सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असून तिच्यावर ५२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाने जूनमध्ये मान्यता दिली होती. यानंतर आता केंद्र सरकारने एअर इंडियात परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. एअर इंडियात परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के असेल. परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली असली तरी कंपनीची मालकी आणि नियंत्रण भारतीयांकडेच राहणार, असे स्पष्ट करण्यात आले. आत्तापर्यंत परदेशी विमान कंपन्यांना भारतातील विमान कंपन्यांमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी होती. मात्र एअर इंडियाचा यात समावेश नव्हता. प्रचंड कर्जभार असलेल्या एअर इंडियाने आत्तापर्यंत तीन वेळा कर्ज उभारले आहे. डिसेंबरमध्ये १,५०० कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये ३२५० कोटी तर ऑक्टोबरमध्ये १५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारले होते.  विशेष म्हणजे एकीकडे सरकारने एफडीआयला परवानगी दिली असली तरी संसदीय समितीने मांडलेले मत वेगळे होते. एअर इंडियाचे खासगीकरण करण्यासाठी ही वेळ योग्य नसून, या कंपनीला सावरण्यासाठी आणखी पाच वर्षे देण्यात यावीत. तसेच सरकारने त्यांचे कर्जही माफ करावे, असे मत संसदीय समितीने व्यक्त केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments