Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशनाराज चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमला चर्चेचे गाजर!

नाराज चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमला चर्चेचे गाजर!

ANI

नवी दिल्ली: चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाने तुर्तास तरी एनडीएतून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले. टीडीपीच्या बैठकीनंतर पक्षातील नेते वाय.एस.चौधरी यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच, भाजपसोबतचे जे काही मतभेद असतील, त्यावर पुढच्या चार दिवसात तोडगा काढला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र तेलगूदेसमलाही चर्चेचे गाजर देण्यात आले.

चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम पक्षाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उघड नाराजी व्यक्त केली होती. सरकारने आंध्र प्रदेशच्या अपेक्षेनुसार, राज्यासाठी कोणतीही तरतूद केली नसल्याचं टीडीपी नेत्यांचं म्हणणं होतं. पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनीही अर्थसंकल्पावरील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.


दुसरीकडे आज सकाळी टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केल्याचं वृत्त होतं. पण अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं टीडीपीच्या नेत्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं.
दुसरीकडे भाजपचे महासचिव राम माधव यांनी, टीडीपी हा आमचा जुना सहकारी पक्ष आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन, तोडगा काढू असं म्हटलं होतं.

टीडीपी आणि चंद्राबाबूंचं महत्त्व
चंद्राबाबू नायडू हे तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या स्थापनेपासून टीडीपी एनडीएत आहे. 2014 साली त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवत विभाजीत आंध्र प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवली. ते 1994 ते 2004 असं सलग दहा वर्षे संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांच्याकडे आंध्र प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती. 2014 साली सत्ता मिळवत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
टीडीपी हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा पक्ष आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत सध्या 175 पैकी 125 जागा टीडीपीकडे आहेत, तर भाजपच्या केवळ 4 जागा आहेत. विरोधी पक्षात असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या 46 जागा आहेत. टीडीपीची एकहाती सत्ता असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये भाजपसाठी चंद्राबाबूंची नाराजी हा मोठा धक्का आहे. कारण, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या 25 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर टीडीपीने विजय मिळवला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments