Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeदेशपाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले - सुषमा स्वराज

पाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले – सुषमा स्वराज

नवी दिल्ली – कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी दोघी विवाहित आहेत. पण पाकिस्तानने दोघींच्या गळयातून मंगळसूत्र, टिकली आणि हातातील बांगडया काढायला लावल्या आणि विधवा म्हणून त्यांना कुलभूषण यांच्यासमोर आणले. कुलभूषण यांची आई अवंती त्यांच्यासमोर आली तेव्हा तिच्या गळयात मंगळसूत्र आणि डोक्यावर टिकली नव्हती. आईला त्या अवस्थेत पाहून कुलभूषण यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व त्यांनी बाबा कसे आहेत असा पहिला प्रश्न विचारला. 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत आज ही माहिती दिली. मराठी ही जाधव कुटुंबाची मातृभाषा आहे. मातृभाषेत संवाद साधणे केव्हाही सोपे पडते. त्यामुळे कुलभूषण यांच्या आईने त्यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पाकिस्तानने त्यांचा इंटरकॉम फोन बंद केला. कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला पाकिस्तानात अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला.

जाधव कुटुंबीय पाकिस्तानात असताना मीडियाला त्यांच्याजवळ येऊ द्यायचे नाही असे दोन्ही देशांमध्ये ठरले होते. पण पाकिस्तानने आपला शब्द पाळला नाही. पाकिस्तानी माध्यमांनी जाधव कुटुंबाला गाठून त्यांना प्रश्नच विचारले नाहीत तर त्यांना छळलं, टोमणे मारले असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.

सुरक्षेच्या नावाखाली कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीचे कपडे बदलण्यात आले. कुलभूषण जाधव यांची आई नेहमी साडी परिधान करते  पण पाकिस्तानने त्यांना ड्रेस घालायला भाग पाडला असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तानने सुरक्षेच्या नावाखाली जाधव यांच्या पत्नीचे बूट जप्त केले आहेत. त्या बुटांमध्ये धातूची चीप असल्याच्या बातम्या आता पाकिस्तानातून येत आहेत. पाकिस्तानात यावर काहीतरी कट शिजत असल्याची शक्यता स्वराज यांनी व्यक्त केली.

जाधव यांच्या पत्नीने एअर इंडियाच्या विमानाने दुबई तिथून एमिराटसच्या विमानाने पाकिस्तानात गेल्या. जर त्यांच्या पत्नीच्या बुटामध्ये चीप होती मग ती चीप पाकिस्तानी विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना कशी सापडली नाही ? असा सवाल स्वराज यांनी विचारला. पाकिस्तानने त्यांच्या देशातील प्रसारमाध्यमांना जाधव कुटुंबाला त्रास देण्याची संधी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments