Friday, March 29, 2024
Homeदेशमहिलेच्या परवानगीशिवाय कोणीही तिला स्पर्शही करू शकत नाही- न्यायालय

महिलेच्या परवानगीशिवाय कोणीही तिला स्पर्शही करू शकत नाही- न्यायालय

नवी दिल्ली- राजधानीतल्या एका न्यायालयानं महिलांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलांच्या संमतीशिवाय त्यांना कोणीही स्पर्श करू शकत नाही, असा निर्णय दिल्लीतल्या एका न्यायालयानं दिला आहे. काही विकृत पुरुष आजही महिलांची छेडछाड करत त्यांना नको त्या ठिकाणी स्पर्श करतात. असे प्रकार होणं हे दुर्दैवी आहे, अशी टिपण्णीही न्यायालयानं केली आहे.

नऊ वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राम नामक नराधमाला न्यायालयानं दोषी ठरवत ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीमा मैनी यांनी उत्तर प्रदेशमध्ये राहणा-या राम या व्यक्तीला ५ वर्षं सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यानं उत्तर दिल्लीतल्या मुखर्जी नगरमधल्या गर्दीच्या परिसरात एका अल्पवयीन मुलीला वाईट हेतूनं स्पर्श केला. हा प्रकार २५ सप्टेंबर २०१४ रोजी घडला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता न्यायालयानं आरोपीला तुरुंगवास दिला आहे.

महिलेचं शरीर हे तिचं स्वतःचं असतं आणि त्यावर फक्त त्या महिलेचाच अधिकार असतो. दुसरी एखादी व्यक्ती त्या महिलेला कोणत्याही उद्देशानं का होईना स्पर्श करू शकत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. महिलांचा मूलभूत अधिकार पुरुषांना मान्य नाही. त्यामुळेच स्वतःची हवस भागवण्यासाठी ते साध्या-भोळ्या मुलींना लक्ष्य करतात आणि त्यांना त्रास देण्याआधी ते विचारही करत नाहीत. राम हा एक विकृत व्यक्ती असून, त्याला जामीन मिळण्याचा कोणताही अधिकार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायालयानं रामला १० हजारांचा दंड ठोठावला असून, त्यातील ५ हजार रुपये हे पीडितेला द्यावे लागणार आहेत. तसेच दिल्ली प्रदेश विधिक सेवा प्राधिकरणाला मुलीला ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments