Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशमोदी, राहुल धर्मनिरपेक्ष आणि मी एकटाच जातीयवादी’

मोदी, राहुल धर्मनिरपेक्ष आणि मी एकटाच जातीयवादी’

महत्वाचे….
१.ओवेसींची पंतप्रधान मोदी, राहुल गांधींवर उपरोधिक टीका २. एकाच ट्विटमधून काँग्रेस आणि भाजपला लक्ष्य ३. सोमनाथ मंदिरातील राहुल गांधी यांच्या नावाच्या नोंदणीवरुन उपस्थित केला मुद्दा


हैदराबाद: एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसींनी भाजप आणि काँग्रेसच्या दांभिकतेवर उपरोधिक टीका केली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून मला कायम जातीयवादी ठरले जाते. मात्र आता या पक्षांचे राष्ट्रवादी आणि धर्मनिरपेक्ष नेते स्वत:ला हिंदू म्हणवून घेत आहेत’, अशा शब्दांमध्ये ओवेसी यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरातील रजिस्टरमध्ये स्वत:ची नोंद बिगर हिंदूम्हणून केली, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर भाष्य करताना ओवेसींनी एकाच ट्विटमधून भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

सोमनाथ मंदिरातील भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी रजिस्टरमध्ये नावाची नोंद करताना ‘बिगर हिंदू’ असा उल्लेख केल्याचा भाजपचा आरोप आहे. भाजपच्या या आरोपांना उत्तर देताना, ‘राहुल गांधी हे जानवं घालणारे ब्राह्मण आहेत,’ असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धा जाहीर कराव्यात, असे आव्हान भाजपकडून देण्यात आले. राहुल गांधी ‘हिंदू’ असल्याचे सांगून लोकांना ‘मूर्ख’ बनवत आहेत, अशी टीकाही भाजपने केली.

राहुल गांधी हिंदू आहेत की बिगर-हिंदू असा वाद सुरु असताना असदुद्दीन ओवेसी यांनी एकाच ट्विटमधून काँग्रेस आणि भाजपला लक्ष्य केले. ‘आमचे उपाध्यक्ष जानवं असणारे हिंदू आहेत, असे काँग्रेसवाले म्हणतात. तर भाजपवाले आमचे मोदी हिंदू (आणि ओबीसी) असल्याचे सांगतात. या लोकांचा गट खूप प्रतिष्ठित आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला तिथे प्रवेश मिळत नाही. कारण मी एकटाच जातीयवादी आहे. इतर सगळे धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादी आहेत,’ असे ट्विट करत ओवेसी यांनी राहुल गांधी आणि मोदींना उपरोधिक टोला लगावला.

एका रजिस्टरवरुन राहुल गांधींसाठी ‘धर्म’संकट निर्माण झाल्यावर भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे त्यांचा धर्म सांगितला. बिगर हिंदूंसाठी असलेले रजिस्टर भरुन त्यांनी त्यांचा धर्म स्पष्ट केला आहे. त्यांची हिंदू धर्मावर श्रद्धाच नाही. मग ते मंदिरांना भेटी देऊन लोकांना मूर्ख का बनवत आहेत?’ असा प्रश्न भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी उपस्थित केला. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने राहुल गांधी यांची जानवं घातलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments