Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशराजस्थान, पश्चिम बंगालमध्ये भाजपा भुईसपाट

राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये भाजपा भुईसपाट

जयपूर/कोलकाता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करत असतानाच राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयसंकल्पाला सुरुंग लागला आहे. राजस्थान आणि पश्निम बंगालमधील एकूण तीन लोकसभा आणि २ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचा निकाल गुरुवारी लागला. या सर्व जागांवर भाजपा भुईसपाट झाली आहे.

राजस्थानमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे तर एका जागेवर विजय मिळवला आहे. राजस्थानमधील तिन्ही जागेवर आधी भाजपचे उमेदवार होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराला पराभवाची धूळ चारली.

राजस्थानमधील पोटनिवडणुकीत अजमेर आणि अलवर लोकसभा जागांवर काँग्रेस उमेदवाराने विजयी आघाडी घेतली आहे. अलवरमधील जागेवर काँग्रेस उमेदवार करण सिंह यादव यांनी भाजप उमेदवार जसवंत सिंह यादव यांच्याविरोधात विजयी आघाडी घेतली आहे. अजमेर येथील जागेवरही काँग्रेस उमेदवार रघू शर्मा हे भाजप उमेदवार स्वरूप लांबा यांचा पराभव करण्याच्या स्थितीत आहेत. मांडलगढ विधानसभा जागेवर काँग्रेस उमेदवार विवेक धाकड यांनी भाजप उमेदवार शक्ती सिंह हाडा यांचा १२ हजार ९७६ मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत नुआपाडा विधानसभा जागेवर तृणमूल काँग्रेसचा उमेदवार सुनील सिंह यांनी भाजपच्या संदीप बॅनर्जी, काँग्रेसच्या गौतम बोस आणि गार्गी चटर्जी यांच्याविरोधात १ लाख ११ हजार ७२९ मतांनी मोठा विजय मिळवला. तर उलुबेरिया लोकसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूलच्या उमेदवार सजदा अहमद यांनी तब्बल ४ लाख ७० हजार मतांनी विक्रमी विजय मिळवला.

का झाल्या पोटनिवडणुका?
राजस्थानच्या अजमेर येथील लोकसभेची जागा सांवरला जाट यांच्या निधनामुळे तर अलवर लोकसभेची जागा महंत चांदनाथ यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. मांडलगड येथील विधानसभेची जागा किर्ती कुमार यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. पश्चिम बंगालमधील उलुबेरिया येथील लोकसभेची जागा टीएमसी खासदार सुल्तान अहमद यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती तर नुआपाडा येथील विधानसभेची जागा काँग्रेस आमदार मधुसुदन धोष यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. त्यामुळे सर्व जागांवर २९ जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments