Friday, March 29, 2024
Homeदेशशीखविरोधी दंगलीतील खटले पुन्हा तपासण्याचे आदेश!

शीखविरोधी दंगलीतील खटले पुन्हा तपासण्याचे आदेश!

महत्वाचे…
१. १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीतील काही खटल्यांचा पुन्हा तपास २. २०१४ मध्ये केंद्र सरकारने शीखविरोधी दंगलीशी संबंधित २९३ खटल्यांचा तपास एसआयटीकडे सोपवला होता ३. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत २,७३३ जणांचा मृत्यू झाला होता


नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीतील काही खटल्यांचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात यावी. ही समिती शीखविरोधी दंगलीतील १८६ खटल्यांचा पुनर्तपास करेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी ज्या खटल्यांचा तपास विशेष तपास समितीकडून (एसआयटी) झाला नव्हता ते खटले नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडे पाठवले जातील.

या समितीमध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसह एक विद्यमान पोलीस अधिकारी आणि निवृत्त पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने १८६ खटल्यांच्या फेरतपासणीचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये केंद्र सरकारने शीखविरोधी दंगलीशी संबंधित २९३ खटल्यांचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. या प्रकरणात आणखी तपासाची गरज आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालायाच्या निरीक्षण समितीने आपला अहवाल सादर केला होता. या दंगलीशी संबंधित २४१ खटले बंद करण्याच्या एसआयटीच्या निर्णयाचा अभ्यास करून हा अहवाल सादर करण्यात आला होता. तर केंद्राने या दंगलीशी संबंधित २५० खटल्यांचा तपास अजूनही सुरू असून २४१ खटल्यांचा तपास बंद करण्यात आल्याचे न्यायालयात सांगितले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत २,७३३ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments