Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशहायकोर्टाच्या जज समोर ‘पद्मावत’चा रात्री शो;

हायकोर्टाच्या जज समोर ‘पद्मावत’चा रात्री शो;

दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही करणी सेनेच्या तीव्र विरोधामुळे राजस्थानमध्ये पद्मावतहा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. राजस्थान हायकोर्टाच्या आदेशानुसार जोधपूरच्या चार न्यायाधीशांसमोर सोमवारी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि भन्साळी यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी भन्साळींनी स्वत: हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

याचिकेच्या पार्श्वभूमीवर या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये डीडवाना पोलीस स्टेशनमध्ये या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोमवारी रात्री ८ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात एका मॉलमध्ये ही स्क्रिनिंग होणार आहे. न्या. संदीप मेहता यांच्यासह इतर तीन न्यायमूर्ती हा चित्रपट पाहतील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिनेमागृहाबाहेर १०० हून अधिक पोलीस तैनात असणार आहेत. इतिहासाची मोडतोड करून या चित्रपटाची निर्मिती केली असून राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न यातून केल्याचा आरोप गुन्हा दाखल करणाऱ्यांनी केला आहे. विरेंद्र सिंह आणि नागपाल सिंह यांनी हा गुन्हा भन्साळी, दीपिका आणि रणवीरविरोधात दाखल केला होता. यावर निर्णय देण्यासाठी चित्रपट पाहणे आवश्यक असल्याचे राजस्थान हायकोर्टाचे न्या. मेहता यांनी सुनावणीदरम्यान म्हटले.

दरम्यान, चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या करणी सेनेने या स्क्रिनिंगला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. ‘आमचा या स्क्रिनिंगला काहीच आक्षेप नाही. न्यायालयाचे आदेश असल्याने स्क्रिनिंगविरोधात आमची काहीच तक्रार नाही,’ असे श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments