बाइक रायडर सना इक्बालचा अपघाती मृत्यू

- Advertisement -

मुंबई – सना इक्बाल या आघाडीच्या महिला बाइक रायडरचा आज मंगळवारी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये सकाळी झालेल्या या अपघातात तिची कार खांबाला आदळली. कारमध्ये तिचे पती होते, ते सुखरूप असून सनानं मात्र जीव गमावला आहे. तिला तिन वर्षांचा मुलगा आहे.

हैदराबादमध्ये उदारमतवादी मुस्लीम घरात जन्मलेल्या सनाला सातवीपासूनच बाइक चालवण्याचं वेड लागलं. लग्नामध्ये आलेल्या अपयशामुळे आत्महत्येचा विचार घोंघावणाऱ्या सनानं २७ व्या वर्षी बाइक अपघातात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिनं बाइकनं गुजरातपर्यंत प्रवास करण्याचा निर्णय घेतला, एकाच इच्छेनं की तिला ट्रक, टँकर असं कुणीतरी उडवेल. मात्र, या प्रवासात तिला साक्षात्कार झाला की शांततापूर्ण आयुष्य हवं असेल तर ते शांततापूर्ण मार्गानं मिळणं शक्य आहे.

- Advertisement -

यानंतरचा प्रवास एका वेगळ्याच सनाचा होता, जी निराश झालेल्या युवकांना आशेचा किरण देऊ शकेल. आत्महत्या हा निराशेपासून पळण्याचा मार्ग कसा असू शकत नाही हे युवकांना समजावण्यासाठी पुढे सनानं आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी तिनं भारताची सगळी राज्यं एकटीनं बाइकवरून प्रवास करण्याचा पण केला आणि आत्महत्याविरोधी प्रचार केला. नोव्हेंबर २०१५ मध्ये गोव्यातून सुरू झालेली ही रॅली जूनच्या १६ तारखेला २०१६ मध्ये संपली. १११ शहरं,२९ राज्यं आणि पाच केंद्रशासित प्रदेश बाइकवरून पार करताना तिनं ३८ हजार किलोमीटरचा प्रवास केला. १३५ ठिकाणी तिनं सेमिनार घेतले आणि आत्महत्येचा मार्ग न चोखाळण्याचं आवाहन निराशाग्रस्त युवकांना केलं.

बायकर्स कम्युनिटीमध्ये अत्यंत आदराचं स्थान असलेल्या सनाच्या अशा आकस्मिक अपघाती मृत्युमुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. आत्महत्येसाठी २७ व्या वर्षी बाहेर पडलेल्या आणि त्यानंतर शांततापूर्ण जीवनाचा साक्षात्कार झालेल्या व तीन वर्षांचं मूल असलेल्या सनाचामृत्यू कार अपघातात व्हावा हा एक दैवदुर्विलासच आहे.

- Advertisement -