विजय मल्ल्यासाठी आर्थर रोड कारागृहात सर्व सुविधा!

- Advertisement -

लंडन – भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले कर्जबुडवे विजय मल्ल्या यांचा भारतीय कारगृह योग्य नसल्याचा दावा खोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थर रोड जेलचे फोटो पाठवले आहेत. राज्य सरकारने आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक १२ चे फोटो पाठवले असून, युरोपमधील कारागृहात असतात त्या सर्व सुविधा येथे असल्याची माहितीही दिली आहे. विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई २६/११ हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं.

‘आम्ही सर्व महत्वाच्या कागदपत्रांसोबत केंद्राला अहवाल पाठवला आहे’, अशी माहिती कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक बी के उपाध्याय यांनी दिली आहे.  सक्तवसुली संचलनालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या केलेल्या मागणीवर युक्तीवाद करताना मल्ल्याच्या वकिलाने आपल्या आशिलाची विशेष काळजी घेण्याची गरज असून, डायबेटिज असल्या कारणाने घरचं जेवणं मिळणं गरजेचं असल्याचं सांगितलं. सोबतच कारागृहांमध्ये शौचालयांची दुरावस्था आणि सरकारी रुग्णालयांमधील असुविधांना मुद्दाही मल्ल्याच्या वकिलाने उपस्थित केला.

राज्य सरकारने मल्ल्याच्या वकिलाचा दावा फेटाळून लावला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यास मल्ल्यावरील कारवाई सुरु असताना आर्थर रोड कारागृहात घरचं जेवण दिलं जाऊ शकतं असं सांगितलं आहे. जर मल्ल्या दोषी सिद्ध झाला तर त्याला कारागृहाच्या जेवणाशिवाय पर्याय नसेल. कारागृह प्रशासनाने मल्ल्याला हवं असेल तर युरोपिअन पद्धतीचं शौचालय बांधण्यास तयार असल्याचंही सांगितलं आहे. ‘आम्ही आर्थर रोड कारागृहात आधीपासूनच काही ज्येष्ठ कैद्यांना युरोपिअन पद्दतीच्या शौचालयाची सुविधा दिली आहे. बराक क्रमांक १२ मध्येही अशा सुविधा आहेत. आम्ही मल्ल्याला या बराकमध्ये ठेऊ किंवा त्याच्यासाठी एक विशेष बांधू’, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या अधिका-याने दिली आहे.

- Advertisement -

बराक क्रमांक १२ मध्ये एकूण १२ कैद्यांसाठी जागा आहे. सध्या राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि पीटर मुखर्जी या बराकमध्ये आहेत. १९२५ रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची ८०४ कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या तिथे २५०० कैद्यांना ठेवण्यात आलं आहे.

मल्ल्यांचं पलायन – 
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. २ मार्चला विजय मल्ल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली – लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती..

- Advertisement -