Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशअम्मांच्या जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय!

अम्मांच्या जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय!

चेन्नई: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राधाकृष्णन नगर म्हणजेच आरके नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन यांनी विजयी मुसंडी मारत सत्ताधारी अण्णाद्रमुकला पराभवाचा धक्का दिला आहे. दिनकरन यांनी अण्णाद्रमुकचे उमेदवार मधुसूदनन यांना ४० हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले.

दिनकरन हे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेल्या शशिकला यांचे भाचे आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. आधी फुटलेले पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम गट एकत्र आले आणि त्यांनी दिनकरन व शशिकला यांचीच पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता आरके नगरचा निकाल दिनकरन यांच्या पारड्यात गेल्याने तामिळनाडूच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळेल, असे बोलले जात आहे. दिनकरन यांना ८९ हजार १३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अण्णाद्रमुकचे उमेदवार मधुसूदनन यांना ४८ हजार ३०६ मते मिळाली. द्रमुकचे एन. मारुथू गणेश यांच्या पारड्यात तिसऱ्या क्रमांकाची २४ हजार ६५१ इतके मते पडली. दिनकरन यांनी ४० हजार ७०७ मतांचे मताधिक्य मिळवून दणदणीत विजय नोंदवला.

हा निकाल म्हणजे सध्या सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकच्या पन्नीरसेल्वम-पलानीस्वामी गटांसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या दोन दशकांत प्रथमच एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला आरके नगरमधून पराभव सहन करावा लागला आहे. जयललिता यांचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख होती. गेल्यावेळी याच मतदारसंघातून जयललिता विजयी झाल्या होत्या.

मी अम्मांचा खरा वारसदार!
मतमोजणीच्या दहाव्या फेरीनंतरची आघाडी पाहता दिनकरन यांचा विजय जवळपास निश्चितच झाला होता. त्यावेळी प्रतिक्रिया देताना दिनकरन यांनी सत्ताधारी गटांवर जोरदार तोफ डागली. मी अम्मांचा खरा वारसदार आहे, असे नमूद करताना पुढच्या तीन महिन्यांत राज्यातील सरकार कोसळेल, असा दावा दिनकरन यांनी केला. मी अपक्ष म्हणून लढलो असलो तरी अम्मांचे आशीर्वाद माझ्यासोबत असून आजच्या निकालांनी अण्णाद्रमुक आणि पक्षाच्या चिन्हाचे भवितव्य निश्चित केले आहे, असा टोलाही दिनकरन यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments