Friday, March 29, 2024
Homeदेशआसाराम बापू बलात्कारीच; न्यायालयाचा फैसला!

आसाराम बापू बलात्कारीच; न्यायालयाचा फैसला!

asaram bapuमहत्वाचे…
१. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील अल्पवयीन मुलगी आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकत होती. तिच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती
२. १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता
३. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते


जोधपूर: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने आसाराम बापूसह सर्व आरोपींना दोषी ठरवले असून त्यांना शिक्षा काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली.

मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी १९ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी ती एस.सी.-एस.टी. प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रकरणांच्या विशेष न्यायालयात या खटल्यातील अंतिम युक्तिवाद ७ एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल २५ एप्रिलला जाहीर करण्यासाठी राखून ठेवला होता.

बुधवारी न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. आसारामबापूसह शिल्पी, शिवा, प्रकाश आणि शरदचंद्र या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले. आम्ही आमच्या वकिलांशी या निकालाबाबत चर्चा करू आणि पुढे काय करायचं ते ठरवू असं आसारामच्या प्रवक्त्या निलम दुबे यांनी सांगितलं आहे. तर आसारामला शिक्षा झाल्यामुळे आपल्याला न्याय मिळाला असल्याची भावना त्या मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. आसारामवर अन्य प्रकरणांतही गुन्हे दाखल असून त्या पीडितांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments