Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशआसाराम ‘या’ अधिकाऱ्यामुळे गेला होता तुरुंगात!

आसाराम ‘या’ अधिकाऱ्यामुळे गेला होता तुरुंगात!

Ajay Pal Lambaजोधपूर: जोधपूरमधील लाचलूचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले अजय लांबा त्यावेळी जोधपूर पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्त होते. त्यांनीच त्या पीडितेच्या तक्रारीवरुन सखोल चौकशी केल्यानंतर तत्कालीन पोलीस उपायुक्त अजय लांबा यांनी ३१ ऑगस्ट २०१३ ला आसारामला अटक केली होती. त्यावेळी आसारामला अटक झाली नसती ते प्रकरण दाबण्यात आले असते.

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने बलात्कारप्रकरणात दोषी ठरवले. १६ वर्षांवरील मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला दोषी ठरवण्यात आले असून विशेष न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनी हा निर्णय दिला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की,उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील १६ वर्षांच्या मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणारी मुलगी आश्रमात भोवळ येऊन पडली होती. तिच्यावर काळी जादू झाली असून तिला काही दिवस जोधपूरमधील आश्रमात न्या, असे आसारामने तिच्या आई- वडिलांना सांगितले. यानंतर १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या मनाई भागातील आश्रमात आसारामने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला होता.

सध्या जोधपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले अजय लांबा त्यावेळी जोधपूर पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त होते. ‘२१ ऑगस्ट २०१३ रोजी दिल्ली पोलिसांचे पथक आणि पीडित मुलगी, तिचे आई- वडील माझ्या कार्यालयात आले. त्यांचा आरोप ऐकून सुरुवातीला मला विश्वास बसत नव्हता. मोठ्या लोकांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असे मला वाटत होते. पण त्यानंतर मी पीडित मुलीशी चर्चा केली. ती आश्रमाची इत्यंभूत माहिती देत होती, आश्रमात त्या रात्री नेमकं काय काय झाल हे ती सांगत होती. जर ती मुलगी आश्रमात गेलीच नसती तर तिला इतकी माहिती नसती. त्यामुळेच मी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय घेतला, असे अजय लांबा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.

‘मेरठमधील एका कुटुंबानेही आसारामवर अशाच स्वरुपाचे आरोप केले होते. आम्ही त्यांची भेट देखील घेतली. पण त्या कुटुंबाने तक्रार दाखल करण्यास नकार दिला. यावरुनच शहाँजहापूरच्या पीडित मुलीचे म्हणणे खरे होते हे आमच्या लक्षात आले’, असे ते नमूद करतात. ३१ ऑगस्ट रोजी आम्ही आसारामला अटक करण्याचा निर्णय घेतला. पण आसाराम कुठे आहे, हेच समजत नव्हते. शेवटी आसारामच्या अटकेसाठी आम्ही सापळा रचला आणि तो यात अलगद अडकला, असे त्यांनी सांगितले.

‘आम्ही इंदूरमध्ये आमची एक टीम पाठवली. याबाबत आसाराम व त्याच्या समर्थकांना पूर्वकल्पना नव्हती. दुसरीकडे आम्ही जोधपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामुळे आसाराम निर्धास्त झाला. ३१ ऑगस्टला दुपारी तो भोपाळ विमानतळावर पोहोचला. याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांना पुरवली. प्रसारमाध्यमांनी त्याचा पाठलाग सुरु केला. तो इंदूरमधील आश्रमात पोहोचताच आमची टीमही तिथे पोहोचली आणि अखेर त्याला अटक झाली, असे लांबा सांगतात.

लांबा यांनी हिंदूस्तान टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आणखी एक माहिती उघड केली. ‘अटकेनंतर मी आसारामला जोधपूरला आणले. जोधपूरमधील विश्रामगृहात त्याला ठेवण्यात आले. मी चौकशी करता खोलीत गेलो त्यावेळी आसाराम सोफ्यावर बसला होता. मी त्याला खाली जमिनीवर बसण्यास सांगताच आसाराम भानावर आला आणि त्याने माझ्या हातून चूक झाली, अशी कबुली दिली, असे लांबा यांनी म्हटले आहे. या खटल्याचा तपास करताना अजय लांबा यांना मनस्तापाचा सामना करावा लागला. त्यांना धमकीचे जवळपास दोन हजार पत्रं आली. याशिवाय आसारामचे समर्थक फोनवरुन धमक्या देखील देत होते. मात्र, तरीही पाल व त्यांच्या टीमने शिताफीने तपास करत आसारामला तुरुंगात पाठविले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments