Friday, March 29, 2024
HomeदेशCAA : ‘हे’ लेखक ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार!

CAA : ‘हे’ लेखक ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार!

author-mujtaba-hussain-to-return-padma-shri-award

नवी दिल्ली : देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. सुधारित नागरिकत्व कायदा हा लोकशाहीवर हल्ला आहे. अशी चिंता व्यक्त करत उर्दू लेखक मुजतबा हुसैन यांनी आपण पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

लोकशाही चिरडली जात असल्याने आपण पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे. याआधी देशात असहिष्णुता निर्माण झाल्याचं सांगत साहित्यिकांसह अनेकांनी पुरस्कार परत केले होते. मुजतबा हुसैन यांनी एएनआयशी बोलताना पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे.

मुजतबा हुसैन यांनी सांगितलं आहे की, “आपली लोकशाही चिरडली जात आहे. कोणतीही प्रथा राबवली जात नाही आहे. पहाटे सात वाजता शपथविधी पार पडत आहे. रात्रीच्या अंधारात सरकार स्थापन केलं जात आहे. देशात भीतीचं वातावरण आहे”.

मुजतबा हुसैन यांनी सध्याची परिस्थिती पाहता आपण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मुजतबा हुसैन यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर बोलताना मुजतबा हुसैन यांनी सांगितलं आहे की, “मी ८७ वर्षांचा आहे. या देशाच्या भविष्याची मला चिंता आहे. या देशाच्या आरोग्याची मला चिंता आहे, जे मी माझ्या मुलांसाठी आणि पुढील पिढीसाठी सोडत आहे”.

“देशात अशांतता, भितीचं वातावरण निर्माण केलं जात असून द्वेषाची आग भडकवली जात आहे. ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. ज्या लोकशाहीसाठी आम्ही इतक्या यातना झेलल्या त्याच्यावर अशाप्रकारे हल्ला होणं निंदनीय आहे. अशा परिस्थितीत कोणताही सरकारी पुरस्कार मी ठेवू इच्छित नाही,” असं मुजतबा हुसैन यांनी सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments