Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींच्या त्या विधानावरुन भाजपाचे यु टर्न!

पंतप्रधान मोदींच्या त्या विधानावरुन भाजपाचे यु टर्न!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संसदेतला गोंधळ आज संपला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत चार ओळीचं निवेदन सादर करत वादावर पडदा टाकला. मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या देशभक्तीवर पंतप्रधान मोदी यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं नाही. तसा त्यांचा हेतूही नव्हता,’ असं निवेदन आज अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत दिलं.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पाकिस्तानची मदत घेत असल्याचा आरोप केला होता. ‘काँग्रेसचे बडतर्फ नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्याची बैठक पार पडली होती. या बैठकीला मनमोहन सिंग आणि हमीद अन्सारीही उपस्थित होते,’ असा आरोपही मोदींनी केला होता. त्यावर संसदेचं अधिवेशन सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत भाजपची संसदेत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मनमोहन सिंग यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत त्यावर मोदींनी माफी मागावी, अशी मागणी करत विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले होते. त्यामुळे अधिवेशन सुरू होऊन आठवडा झाला तरी संसदेत कामकाज होत नव्हते.
आज स्वत: अरुण जेटली यांनी राज्यसभेत मोदींच्या वक्तव्यावर निवेदन सादर केले. ‘मनमोहन सिंग आणि अन्सारी यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असा काही मोदी यांच्या बोलण्यामागचा हेतू नव्हता. आम्ही या दोन्ही नेत्यांचा आदरच करतो. त्यांच्या देशाबद्दलच्या निष्ठेलाही आम्ही मानतो,’ असं जेटली यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं. यावेळी पंतप्रधान मोदी संसदेत उपस्थित नव्हते. दरम्यान, जेटली यांनी दिलेल्या निवेदनानंतर काँग्रेसनेही नरमाईची भूमिका घेतली. ‘या प्रकरणावर निवेदन दिल्यामुळे आम्ही जेटली यांचा मान राखतो. त्यामुळे यापुढे संसदेचं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचं आश्वासन आम्ही देतो. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना सहकार्यच करेल,’ असं काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments