Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशअरविंद केजरीवालांनी मागितली नितीन गडकरींची माफी

अरविंद केजरीवालांनी मागितली नितीन गडकरींची माफी

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांची माफी मागितल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी गडकरींची माफी मागितली आहे.

केजरीवाल यांनी नितीन गडकरी यांना पत्र लिहून केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत केस बंद करण्याचा आग्रह केला. दोन्ही नेत्यांनी सहमतीने केस बंद करण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर नितीन गडकरींनी पटियाला हाऊस कोर्टातील मानहानीचा खटला मागे घेतला आहे.

✔@ANI

#Delhi CM Arvind Kejriwal sought apology from Congress leader Kapil Sibal

2:55 PM – Mar 19, 2018

भारतातील सर्वात भ्रष्ट लोकांच्या यादीत नितीन गडकरी यांचा सहभाग आहे, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होते. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर नाराज होऊन नितीन गडकरी यांनी केजरीवालांवर मानहानीचा खटला दाखल केला होता. आपकडून नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटलं आहे की, ‘माझं तुमच्याशी काहीही वैयक्तिक भांडण नाही. आधी केलेल्या वक्तव्यावर मी माफी मागतो’.

दुसरीकडे, मजिठियांची आणि गडकरींची माफी मागितल्यानंतर अरविंद केजरीवाल आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माफी मागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा, दीपक वाजपेयी या आपच्या नेत्यांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी जेटलींवर केला होता. त्याविरोधात जेटली यांनी या सर्वांविरोधात न्यायालयात खेचत १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही केला. या खटल्यामध्ये प्रारंभीच्या काळात ख्यातनाम विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केजरीवालांची बाजू मांडली. मात्र न्यायालयात त्यांनी बाजू मांडताना वापरलेल्या शब्दांवर अरुण जेटली यांनी आक्षेप घेतला. हे शब्द तुमच्या अशिलाने वापरण्यास सांगितले आहेत का असे न्यायालयाने विचारताच जेठमलांनी यांनी होय, हे शब्द माझे अशिल (केजरीवाल) यांनी वापरण्यास सांगितले असे स्पष्ट केले होते. मात्र केजरीवाल यांनी त्यावर आपण असं काहीच सांगितलं नव्हतं असे सांगत जेठमलानी यांनाच अडचणित आले. त्यामुळे संतापलेल्या जेठमलानी यांनी त्यांची बाजू मांडणार नसल्याचं स्पष्ट केलं.

त्याचप्रमाणे जेटली यांच्या खटल्यासाठी लागणारा सर्व खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून केला जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच केजरीवाल सरकारी तिजोरीची उधळपट्टी आपल्या खटल्यासाठी करत असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यामुळे जेठमलानी यांनी हा खटला आपण मोफत लढू असे आश्वासन दिले होते मात्र नंतर खटला सोडल्यानंतर त्यांनी भलंमोठं बिल केजरीवाल यांना पाठवून दिले होते. अशा प्रकारे जेटली यांच्या खटल्यामध्ये केजरीवाल चांगलेच जेरीस आले. माफी मागितल्यानंतर मजिठिया यांनी केजरीवालाचे आभार मानले असले तरी पक्षात निर्माण झालेली दुफळी आणि अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या दाव्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहेच. या दाव्यातही त्यांना माफी मागावी लागली किंवा दंड भरावा लागला तर दोन्हीही परिस्थितीत केजरीवाल यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. तसेच आम आदमी पक्षातर्फे यापुढे केल्या जाणाऱ्या कोणत्याही दावा किंवा आरोपाच्या गांभिर्यावर लोक आणि माध्यमं प्रश्नचिन्ह उभे करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments