रविवारी दिल्ली मेट्रोही बंद!

- Advertisement -

Metro Stop in Delhi, CAAनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहेत. त्यानुसार दिल्ली मेट्रोनेही रविवारी दिवसभर आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घरातच रहावं, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं दिल्ली मेट्रोने जाहीर केलं आहे.

मेट्रो हे दिल्लीतील प्रवासाचं सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. पण मेट्रो सेवाच बंद असल्यामुळे राजधानी दिल्लीही ठप्प होणार आहे. शिवाय अगोदरच दिल्लीतील सर्व मॉल्स बंद ठेवण्यात आले असून गर्दी टाळण्याचंही आवाहन सातत्याने केलं जात आहे.

दिल्लीत फक्त मेडिकल, भाज्यांची आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः याबाबतचा निर्णय जाहीर केला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जेएनयू प्रशासनानेही वसतीगृह खाली करण्याचे आदेश दिले असून खानावळ फक्त पुढील ४८ तासांसाठीच चालू असणार आहे.

- Advertisement -

दिल्लीही करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांपैकी एक आहे. यासाठी दिल्ली सरकारकडून सर्व प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात आहेत. ३१ मार्चपर्यंत सर्व मॉल्स बंद ठेवले जाणार आहेत. याशिवाय शक्य असेल त्यांना घरातूनच कामाचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात कायमस्वरुपी आणि कंत्राटी या दोन्ही श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जाईल.

करोनाचा वाढता धोका पाहता अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व रेस्टॉरंट्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. उपराज्यपालांसोबत बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता, ज्यानुसार रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्यास मनाई करण्यात आली आहे. पण होम डिलिव्हरी चालू ठेवण्यास परवानगी आहे. कोणत्याही कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली होती, पण ही मर्यादा आता २० वर आणण्यात आली असून नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यासाठी बंदी घातली आहे. ३१ मार्चपर्यंत हा आदेश लागू असेल. या काळात कोणत्याही प्रकारचं आयोजन करता येणार नाही. अनावश्यकपणे घराच्या बाहेर पडू नये असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.

- Advertisement -