अखेर काँग्रेसने हार्दिकच्या हस्तक्षेपणानंतर उमेदवार बदलले

- Advertisement -

गांधीनगर:  हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार आरक्षण आंदोलन समितीला चार जागांपेक्षा एकही जागा न सोडण्याचा हेका धरणाऱ्या काँग्रेसला पाटीदारांच्या राड्यानंतर उमेदवार बदलावे लागले.पाटीदारांच्या नाराजीनंतर काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी नवी यादी जारी केली आहे. या १३ उमेदवारांच्या यादीत हार्दिक पटेलला हव्या असलेल्या सौराष्ट्र आणि कच्छमधील नऊ उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय पाटीदारांच्या मागणीनंतर काँग्रेसने चार उमेदवार बदलले असून त्यात सूरतमधील दोन जागांचा समावेश आहे.

दुसऱ्या यादीत ज्या जागांवरील उमेदवार बदलण्यात आले आहेत, त्यात सौराष्ट्रमधील जुनागड, सूरतमधील कामरेज आणि वरक्षा येथील भरूचचा समावेश आहे. सूरत आणि वरक्षामध्ये पाटीदारांची मोठी संख्या असून हार्दिक पटेल यांच्या दबावामुळे या जागांवरील उमेदवार काँग्रेसला बदलावे लागले आहेत. याच जागांवर हार्दिकने दावा केला होता. त्यामुळे काँग्रेसला हे पाऊल उचलावे लागले आहे. काँग्रेसने जुनागडमधून भीखाभाई जोशींच्या जागी अमित थुम्मर यांना तर भरूचमध्ये किरन ठाकोर यांच्याजागी जयेश पटेल यांना तिकीट दिलं आहे. याशिवाय अशोक जीरावाला हे निलेशक कुंबानींच्या जागेवर कामरेजमधून लढणार आहेत.
रविवारी काँग्रेसने ७७ उमेदवारांची पहिली यादी जारी केली होती. पण ही यादी येताच आपल्या उमेदवारांची तिकीटं कापली गेल्याचं लक्षात आल्यावर हार्दिक पटेलच्या पाटीदार आरक्षण आंदोलन समितीने या यादीला जोरदार विरोध केला होता. काँग्रेसच्या निषेधार्थ हार्दिकचे समर्थक रस्त्यावरही उतरले होते. त्यामुळे काँग्रेसला माघार घेत यादीतील नावे बदलावी लागली आहेत.

- Advertisement -