मी ‘हिंदू विरोधी’ नाही- कमल हासन!

- Advertisement -

चेन्नई – दक्षिणेचा सुपरस्टार कमल हासन यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असून जानेवारी महिन्यात पक्षाची रितसर घोषणा केली जाणार आहे. आपण हिंदू विरोधी नसल्याचे किंवा कोणाच्याही भावना जाणून बुजून दुखवल्या नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

कमल हासन यांचा आज ६३ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने राजकीय पक्ष स्थापन करण्यापूर्वी आपल्या चाहत्यांच्या आणि फॉलोअर्सच्या संपर्कात राहण्यासाठी एक अॅप लाँच करण्यात आला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत हासन बोलत होते.
कमल हासन म्हणाले, ”लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी मी तामिळनाडूचा दौरा करणार आहे. याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.” आपल्याला लोक पक्ष कधी स्थापन करणार याविषयी नेहमी विचारत असतात. याबद्दल बोलताना हासन म्हणाले, ”बरेचसे पूर्व कार्य पार पडले आहे. मी तज्ञांशी आणि मित्रांशी याविषयावर बोलत आहे आणि योग्यवेळी याची घोषणा करणार आहे.” अलिकडेच त्यांनी व्यक्त केलेल्या ‘हिंदू अतेरिकी’ या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना हासन म्हणाले, ”मी पक्षाची स्थापना हिंदूंना दुखवण्यासाठी करीत नाही. मी हिंदु कुटुंबातून आलो आहे आणि सर्व प्रथम माझ्या कुटुंबियांचे प्रेम मला हारवायचे नाही. मला हिंदूंना दुखवायचे नाही. पण पण चुकीचे घडत असेल तर मी त्याबद्दल बोलेन.”
” हिंसेचा विषय येतो तेव्हा याबद्दल बोलणारा मी एकटाच नाही. कोणीही अशा हिंसेचे समर्थन करु शकत नाही. हे हिंदू आणि मुस्लीमांनाही लागू होते. मी जेव्हा जास्त होतंय म्हणतो त्याचा अर्थ दहशत नव्हे. पण तिथे हिंसा आहे.”, असेही ते म्हणाले.

हिंदूत्ववाद्यांनी त्याच्यावर टिका केली, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ”मी केवळ सत्य बोलतो. यासाठी मला जर कोणी शिक्षा देणार असेल तर मी त्यासाठी तयार आहे.” ” सर्व धर्मियांमध्ये माझे मित्र आणि नातेवाईक आहेत, तरीही काही लोक मला हिंदू विरोधी समजतात. मी माझ्या ब्राम्हण असण्यापासून दूर गेलोय. हा एक सत्याचा शोध आहे. याच्याबद्दल अभिमान किंवा लज्जा बाळगायची गरज नाही. काहीजण मला निरश्ववादी म्हणताहेत पण मी तर्कसंगतीने विचार करणारा व्यक्ती आहे.” कमल हासन यांना अनेक विषयांवर पत्रकारांनी बोलते केले. यावेळी अतिशय अभ्यासपूर्ण आणि तर्कसंगत उत्तरे देऊन पत्रकारांना समाधानी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तामिळनाडूच्या राजकारामध्ये सिने कलाकारांचे मोठे वर्चस्व राहिले आहे. एम.जी. रामचंद्रन, जयललीता यांनी केवळ नेतृत्वच केले नाही तर राज्याचे मुख्यमंत्री पददेखील भूषवले होते. रजनीकांत राजकारणाच्या आखाड्यात उतरणार अशी चर्चा बराच काळ रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर कमल हासन यांनी आपला पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली असून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह भरला आहे. येत्या काळात तामिळनाडूच्या राजकारणात कमल हासन आपला करिश्मा कसा दाखवतात हा चर्चेचा विषय ठरणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -