Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशमी चहा विकला, पण देश विकला नाही- नरेंद्र मोदी

मी चहा विकला, पण देश विकला नाही- नरेंद्र मोदी

राजकोट: मी चहा विकला होता. पण देश विकला नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी युथ काँग्रेसच्या मासिकाने मोदींचे व्यंगचित्र ट्विट करुन चहावालाम्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. काँग्रेसच्या याच टीकेला मोदींनी गुजरातमधील राजकोट येथील सभेत उत्तर दिले आहे.

‘मी गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून माझ्यावर टीका केली जाते. एका गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान झाली आहे. मात्र हे काँग्रेसच्या अद्याप पचनी पडलेले नाही. काँग्रेसने अशाप्रकारे गरिबांची थट्टा करणे थांबवावे. त्यांनी माझ्या बालपणीच्या गरिबीची चेष्टा करु नये,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी ‘चहावाला’ म्हणून टीका करणाऱ्या काँग्रेसला उत्तर दिले. ‘एखादा पक्ष इतक्या खालच्या पातळीवर कसा काय उतरु शकतो?,’ असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या सौराष्ट्रमधील राजकोट येथे बोलताना मोदींनी माजी मुख्यमंत्री बाबुभाई जशभाई पटेल यांचा उल्लेख केला. ‘जनसंघाच्या पाठिंब्यामुळेच पटेल समाजातील बाबुभाई जशभाई पटेल मुख्यमंत्री झाले. मात्र काँग्रेसला हे आवडले नाही आणि त्यांनी बाबुभाईंचे सरकार टिकूच दिले नाही,’ असे मोदींनी म्हटले. काँग्रेसने नेहमीच पटेलांची उपेक्षा केली, असेही मोदींनी म्हटले. ‘केशुभाई पटेल यांच्या रुपाने सौराष्ट्रातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी आली होती. त्यांना पदावरुन हटवण्यासाठी काँग्रेसने सर्वतोपरी प्रयत्न केले. काँग्रेसने आनंदीबेन पटेल यांचेही मुख्यमंत्रिपद डळमळीत करण्याचा प्रयत्न केला,’ असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.

‘जातीजातींमध्ये संघर्ष निर्माण करायचा, ही काँग्रेसची वृत्ती आहे. त्यांच्या प्रलोभनांना भुलून त्यामध्ये फसू नका,’ असे आवाहन मोदींनी उपस्थितांना केले. ‘प्रत्येक समस्येला विकास हेच एकमेव उत्तर आहे. त्यामुळे विकासाची प्रकिया कायम पुढे जात राहायला हवी. आम्हाला गुजरातच्या जनतेसाठी आणखी काम करायचे आहे,’ असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments