Friday, March 29, 2024
Homeदेशगुजरातमध्ये अपक्ष आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

गुजरातमध्ये अपक्ष आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचं वादळ शांत झालं असलं, तरी घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण अपक्ष आमदार भूपेंद्रसिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे.

भूपेंद्रसिंह हे मोरवा हदफ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते मूळचे काँग्रेस कार्यकर्तेच होते. मात्र भारतीय ट्रायबल पार्टीसोबत (बीटीपी) काँग्रेसने युती केली होती. मोरवा हदफ विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने भारतीय ट्रायबल पार्टीला सोडली. मात्र तिथून या पार्टीचा उमेदवार पराभूत झाला आणि अपक्ष म्हणून उभे राहिलेले भूपेंद्रसिंह खांट जिंकले.
भाजपच्या विक्रमसिंह दिंडोर यांचा भूपेंद्रसिंह खांट यांनी ४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. तर बीटीपीचे अल्पेश दामोर तिसऱ्या स्थानावर राहिले.

गुजरातमध्ये सध्याचे पक्षीय बलाबल कसे आहे?

भाजप – ९९
काँग्रेस – ७७
एनसीपी – १
बीटीपी – २
अपक्ष – ३

आता अपक्षांपैकी एकजण म्हणजे भूपेंद्रसिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. त्यामुळे फक्त काँग्रेसच्या संख्याबळात एकने भर पडून आमदार संख्या 78 वर गेली आहे. शिवाय, बीटीपीचे दोन आणि अपक्षांमधील आणखी एक असलेला जिग्नेश मेवाणी हा सुद्धा काँग्रेसच्या बाजूनेच आहे. कारण जिग्नेशच्या मतदारसंघातून म्हणजे वडगावमधून काँग्रेसने विरोधी उमेदवार दिला नव्हता. शिवाय जिग्नेशही जाहीरपणे काँग्रेसला समर्थन देतो. त्यामुळे एकंदरीत काँग्रेस आणि काँग्रेस समर्थक आमदारांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे, अपक्ष आमदार रतनसिंह राठोड यांनी भाजपला समर्थन दिले आहे. त्यामुळे भाजप आणि भाजप समर्थक आमदारांची संख्या १०० वर पोहोचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments