Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशजयराम ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली!

जयराम ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली!

सिमला – गुजरातमध्ये काल मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आज हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळयाला उपस्थित आहेत. रिज शिमला येथे सुरु असलेला हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. 

महेंद्र सिंह, किशन कपूर आणि सुरेश भारद्वाज यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. अनिल शर्मा, सरवीन चौधरी आणि राम लाल मारकंडा यांनी सुध्दा मंत्रिपदाची शपथ घेतली. विरेंद्र कनवर, विक्रम सिंह यांनी सुद्धा शपथ घेतली.

६८ सदस्यांच्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले पण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाल्यामुळे तिथे मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. अखेर नव्याने निवडून आलेल्या सर्व आमदारांनी एकमताने जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली.

कोण आहेत जयराम ठाकूर …
जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करुन भाजपाने धुमल यांच्या तुलनेत तरुण पण हिमाचल भाजपातील ज्येष्ठ नेत्यास संधी दिली आहे. जयराम ठाकूर हे  भाजपाचे मंडी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ठाकूर यांच्या रुपाने भाजपाने पुन्हा रजपूत व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी संधी दिली आहे. अत्यंत तरुण वयातच ठाकूर अभाविपचे कार्यकर्ते म्हणून काम करु लागले.

काही दिवस जम्मू आणि काश्मीरमध्ये अभाविपचे काम केल्यावर १९९३ साली वयाच्या २८ व्या वर्षी ते विधानसभेची पहिली निवडणूक लढले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी १९९८ साली विधानसभेत प्रथमच प्रवेश केला, त्यानंतर ते सतत विजयी होत गेले. प्रेमकुमार धुमल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती. ठाकूर यांनी २०१३ साली मंडी लोकसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवली होती मात्र तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचा विजय झाल्यामुळे त्यांना लोकसभेत जाता आले नाही. असे असले तरी ठाकूर यांची मंडी विभागावर पकड कायम राहिली. मंडी विभागात १० पैकी ९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments