Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशकेजरीवालांचा ‘माफीनामा राजकारण’ तापले!

केजरीवालांचा ‘माफीनामा राजकारण’ तापले!

bikram singh, arvind kejriwal, delhiनवी दिल्ली- आरोपांची बेछूट राळ उडवून देणाऱ्या आम आदमी पक्षाला गेल्या काही वर्षांमध्ये अनेकवेळा मानहानी केल्याच्या खटल्यांना सामोरे जावे लागले आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर ड्रग्जच्या व्यापाराचा आरोप केल्यानंतर त्यांनीही आम आदमीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानी केल्याची तक्रार दाखल केली. केजरीवाल यांनी मजिठिया यांच्याशी माफी मागून या प्रकरणातून बाहेर पडले.

या माफीनाम्यामुळे केजरीवाल यांच्या पक्षातच गोंधळ उडाला असून आपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माफिनाम्यामुळे आम आदमीमध्ये राजकारण सुरु झाले आहेत.

मजिठियांची माफी मागितल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माफी मागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा, दीपक वाजपेयी या आपच्या नेत्यांविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी जेटलींवर केला होता. त्याविरोधात जेटली यांनी या सर्वांविरोधात न्यायालयात खेचत १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही केला. या खटल्यामध्ये प्रारंभीच्या काळात ख्यातनाम विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केजरीवालांची बाजू मांडली. मात्र न्यायालयात त्यांनी बाजू मांडताना वापरलेल्या शब्दांवर अरुण जेटली यांनी आक्षेप घेतला. हे शब्द तुमच्या अशिलाने वापरण्यास सांगितले आहेत का असे न्यायालयाने विचारताच जेठमलांनी यांनी होय, हे शब्द माझे अशिल (केजरीवाल) यांनी वापरण्यास सांगितले असे स्पष्ट केले होते. मात्र केजरीवाल यांनी त्यावर आपण असं काहीच सांगितलं नव्हतं असे सांगत जेठमलानी यांनाच अडचणित आणले. त्यामुळे संतापलेल्या जेठमलानी यांनी त्यांची बाजू मांडणार नसल्याचे स्पष्ट केले.


त्याचप्रमाणे जेटली यांच्या खटल्यासाठी लागणारा सर्व खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून केला जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच केजरीवाल सरकारी तिजोरीची उधळपट्टी आपल्या खटल्यासाठी करत असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यामुळे जेठमलानी यांनी हा खटला आपण मोफत लढू असे आश्वासन दिले होते मात्र नंतर खटला सोडल्यानंतर त्यांनी भलंमोठं बिल केजरीवाल यांना पाठवून दिले होते. अशा प्रकारे जेटली यांच्या खटल्यामध्ये केजरीवाल चांगलेच जेरीस आले.


माफी मागितल्यानंतर मजिठिया यांनी केजरीवालाचे आभार मानले असले तरी पक्षात निर्माण झालेली दुफळी आणि अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या दाव्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहेच. या दाव्यातही त्यांना माफी मागावी लागली किंवा दंड भरावा लागला तर दोन्हीही परिस्थितीत केजरीवाल यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. तसेच आम आदमी पक्षातर्फे यापुढे केल्या जाणाऱ्या कोणत्याही दावा किंवा आरोपाच्या गांभिर्यावर लोक आणि माध्यमं प्रश्नचिन्ह उभे करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments