कार चोरीसाठी केली प्लास्टिक सर्जरी

- Advertisement -

पोलिसांना चकवा देण्यासाठी एका चोरट्याने चक्क प्लास्टिक सर्जरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ५०० हून अधिक कार चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या कुणाल उर्फ तनुजला पोलिसांनी अटक केली असून पोलीस चौकशीदरम्यान त्याने ही कबुली दिली.

दिल्लीत राहणारा तनुज १९९७ मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रीय झाला. यानंतर तनुज कार चोरी करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला आणि तोदेखील वाहनांची चोरी करु लागला. याच दरम्यान, तनुजला अमली पदार्थाचे व्यसन लागले. तनुजने स्वतःची टोळी तयार केली. टोळीतील प्रत्येक सदस्याला त्याने कार चोरी करण्याची पद्धत शिकवली. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने प्लास्टिक सर्जरीही केली आणि स्वतःचे नाव बदलून तनुजऐवजी कुणाल ठेवले. याच दरम्यान तो चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात गेला. त्याची जामिनावर सुटकादेखील झाली. तनुजच्या प्लास्टिक सर्जरीविषयी पोलिसांना माहितीदेखील नव्हती. मात्र, १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी कार चोरी करणाऱ्या कुणालला अटक केली तेव्हा कुणाल – तनुज हे चोरटे एकच असल्याचे उघड झाले. कुणालने यावर्षी फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत दिल्ली आणि लगतच्या राज्यांमधून तब्बल १०० कार चोरल्याची कबुली दिली. सध्या त्याच्याकडून १२ कार जप्त करण्यात आल्या असून उर्वरित कार जप्त करण्याची प्रक्रीया लवकरच सुरु केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

अशी होते चोरीच्या कारची विक्री
कार चोरी ते विक्री या संपूर्ण साखळीत तीन टीम कार्यरत असतात. यात प्रत्यक्षात जाऊन चोरी करणारे चोरटे, चोरी केलेल्या कारच्या इंजिनचे चेसिस नंबर बदलून त्यांची नोंदणी करणारे दलाल आणि चोरीच्या गाड्या विकणारे डिलर असे तीन टप्पे असतात.

- Advertisement -
- Advertisement -