राहुल गांधींच्या मदतीनेच माझा मुलगा पायलट : निर्भयाची आई

- Advertisement -

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत २०१२ मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला. या दु:खद घटनेतून निर्भयाचं कुटुंब हळूहळू सावरत आहे. निर्भयाचा भाऊ आता पायलट बनला आहे. यासाठी निर्भयाची आई आशा देवी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.

“निर्भयाचा भाऊ आज पायलट आहे तर तो केवळ राहुल गांधी यांच्यामुळेच,” असं आशा देवी म्हणाल्या. आशा देवी यांनी सांगितलं की, “त्या दुर्दैवी घटनेनंतर निर्भयाचं कुटुंब पूर्णत: खचलं होतं. पण तिच्या भावाचं अभ्यासावरुन लक्ष विचलित झालं नाही. राहुल गांधींनी केवळ त्याच्या शिक्षणासाठीच मदत केली नाही तर त्याला सातत्याने फोन करुन प्रोत्साहनही दिलं.”

“लक्ष विचलित न करता आपल्या ध्येयाचा पाठलाग कर,” असा सल्ला राहुल गांधींनी निर्भयाच्या भावाला दिल्याचं आशा देवी यांनी सांगितलं. “निर्भयाच्या भावाला सैन्यात सामील व्हायचं असल्याचं समजल्यानंतर, राहुल गांधींनी त्याला बारावीचं शिक्षण झाल्यावर पायलटचं प्रशक्षिण घेण्याचा सल्ला दिला,” असं आशा देवी म्हणाल्या. निर्भयासोबत ही भीषण घटना घडली, त्यावेळी तिचा भाऊ बारावीत शिकत होता.

- Advertisement -

2013 मध्ये सीबीएसईची परीक्षा दिल्यानंतर त्याने रायबरेलीची इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीत प्रवेश घेतला. यानंतर तो रायबरेलीला शिफ्ट झाला, तिथे त्याला फार अडचणी आल्या. तरीही तो मागे हटला नाही. १८ महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान तो सातत्याने निर्भया प्रकरणाचे अपडेट्स घेत होता. याचदरम्यान राहुल गांधी त्याच्याशी फोनवरुन संपर्कात होते. कधीही माघार घेऊ नको, असं राहुल गांधी त्याला सांगत होते.

“आता त्याचं शिक्षण पूर्ण झालं असून गुरुग्राममध्ये प्रशिक्षण घेत आहे. लवकरच तो विमान उडवेल. राहुल यांच्याशिवाय त्यांची बहिण प्रियांका गांधी यादेखील अनेक वेळा निर्भयाच्या भावाशी फोनवरुन बातचीत करत त्याची विचारणा करत असत,” असंही निर्भयाच्या आईने सांगितलं.

निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप असून एकाने न्यायालयात आत्महत्या केली. तर उर्वरित चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तीन वर्षांनी सुटका झाली आहे.

- Advertisement -