Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेश‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी नसतील’

‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी नसतील’

नवी दिल्ली: संसदेत काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. या आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान आणखी एक बातमी समोर येते आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एका दिग्गज काँग्रेस नेत्याने हा अंदाज वर्तवल्याचे या बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.

राजस्थान आणि पश्चिम बंगाल येथील पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. तसेच गुजरातमध्येही काँग्रेसने भाजपला काँटेकी टक्कर दिली. त्यामुळे २०१९ मध्ये चित्र बदलेल असे या नेत्याने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला चांगले यश मिळू शकेल. गुजरात निवडणुकांमध्ये जे घडले ते लोकसभा निवडणुकांमध्येही होऊ शकते. तसे झाल्यास त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेसला होईल आणि भाजपला सत्ता गमवावी लागेल आणि मिळाली तरीही काठावर मिळू शकेल असाही अंदाज या नेत्याने वर्तवला आहे.

टीडीपी अर्थात तेलगु देसमने आंध्र प्रदेशात बजेटसाठी काहीही तरतूद नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळाचा नारा देत भाजपसोबत जाणार नसल्याचेच म्हटले आहे. एनडीएतले घटकपक्ष भाजपवर नाराज होत आहेत त्याचा फायदा काँग्रेसला होईल. तसेच महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, झारखंड आणि छत्तीसगढ या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येऊ शकते अशीही शक्यता या वरिष्ठ नेत्याने वर्तवली आहे.

२०१९ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार असेल किंवा भाजपचे सरकार आले तरीही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसतील. भाजपला २२० जागा मिळू शकतील सत्तास्थापनेसाठी घटक पक्षांची मदत घ्यावी लागेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपची सत्ता आली तर नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राजनाथ सिंह हे पंतप्रधानपदी बसू शकतील असाही अंदाज या नेत्याने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments