Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशनरोडा पाटिया हत्याकांड: बाबू बजरंगीची शिक्षा कायम, माया कोडनानींना सोडले

नरोडा पाटिया हत्याकांड: बाबू बजरंगीची शिक्षा कायम, माया कोडनानींना सोडले

Maya Kodnani, Babu Bajrangi

अहमदाबाद: अहमदाबाद शहराच्या सीमेवर असलेल्या नरोडा पाटिया उपनगरात गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत ९७ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. विशेष न्यायालयाने कोडनानी, बाबू बजरंगीसह ३२ जणांना दोषी ठरवले

गुजरातमधील बहुचर्चित नरोडा पाटिया नरसंहारा प्रकरणी गुजरात हायकोर्टाने आज निर्णय दिला. हायकोर्टाने भाजपाच्या माजी नेत्या माया कोडनानी यांना दोषमुक्त केले असून बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी पटेलची आजीवन तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवण्यात आली.

अहमदाबाद शहराच्या सीमेवर असलेल्या नरोडा पाटिया उपनगरात गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत ९७ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. नरोडा पाटिया हे प्रकरण गुजरात दंगलीशी संबंधित विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) तपास करण्यात येत असलेल्या नऊ प्रकरणांपैकी एक होते. नरोडा येथून तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या कोडनानी या मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या. या हत्याकांडाप्रकरणी ऑगस्ट २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने कोडनानी, बाबू बजरंगीसह ३२ जणांना दोषी ठरवले होते. यातील ३० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जातीय दंगली हा राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला लागलेला कर्करोग असल्याचे परखड मत न्या. यज्ञिक यांनी २०१२ मध्ये शिक्षा सुनावताना व्यक्त केले होते. बाबूबजरंगीला आयुष्यभर तुरुंगातच राहावे लागणार होते. तर कोडनानी यांना २८ वर्षे तुरुंगात काढावी लागणार होती.

दोषी ठरलेल्यांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवर गुजरात हायकोर्टाने शुक्रवारी निकाल दिला. हायकोर्टाने कोडनानी यांना दोषमुक्त केले आहे. दंगलीच्या आरोपातून निर्दोष सुटका झाल्याने माया कोडनानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने सुनावलेली २८ वर्षांची शिक्षा आता रद्द झाली आहे. तर बाबूबजरंगीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. माया कोदनानी यांच्याविरोधात ठोस पुरावा नसल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments