Friday, March 29, 2024
Homeदेशभाजपला पराभूत केले जाऊ शकते हाच ‘गोरखपूर’ निकालाचा संदेश- अखिलेश यादव

भाजपला पराभूत केले जाऊ शकते हाच ‘गोरखपूर’ निकालाचा संदेश- अखिलेश यादव

Akhilesh Yadav

लखनऊ-गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालाने आमच्या पक्ष कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण केलाच, शिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करता येऊ शकतो हा स्पष्ट संदेशही दिला, असे मत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्यक्त केले.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यादव म्हणाले की, ‘या दोन्ही मतदारसंघांतील विजय मोठा आहे कारण हा फक्त विजयच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पराभवही आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपसाठी देशभर प्रचार करत होते, पण ते स्वत:ची जागाही वाचवू शकले नाहीत. भाजपला जर त्यांच्याच बालेकिल्ल्यात हरवता येते तर मग देशात इतरत्र कुठेही पराभूत करता येऊ शकेल, असा स्पष्ट संदेश या निकालांनी देशभर गेला आहे.’ कमी मतदान झाल्यामुळे पराभव झाला, या भाजपच्या युक्तिवादावर, ‘जास्त मतदान झाले असते तर आमचे विजयी मताधिक्य अधिक असते,’ असा दावाही त्यांनी केला. भाजपने लोकांची दिशाभूल करून २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्या पक्षाने आपली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशी टीकाही अखिलेश यांनी केली.

आघाडीच्या नेत्याची निवड योग्य वेळी

२०१९ ची संभाव्य आघाडी आणि काँग्रेससोबतचे संबंध या मुद्द्यावर अखिलश यांनी सांगितले की, माझे काँग्रेससोबतचे संबंध पुढेही चांगलेच राहतील. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही राज्यात प्रबळ आहोत. आघाड्यांची तयारी सुरू आहे. योग्य वेळी आम्ही नेता निवड करू.

कायदा-सुव्यवस्था बिघडली

भाजपच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप करून अखिलेश म्हणाले की, योगी सरकार चकमकी घडवत आहे, पण या राजकीय चकमकी आहेत. या प्रकरणांची चौकशी आता किंवा नंतर कधीतरी होईल हे मी त्यात सहभागी असलेल्यांना सांगू इच्छितो. धार्मिक कट्टरता आणि जातिवाद वाढवून भाजप समाजाला नुकसान पोहोचवत आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याबद्दल विचारले असता अखिलेश म्हणाले की, ते फक्त माझे नातेवाईकच नाहीत तर मोठे नेते आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी मी किरण्मय नंदा यांना पाठवले होते.

डिंपल यादव यांना तिकीट देणार नाही
आमच्या पक्षावर ‘घराणेशाही’चा आरोप होत आहे. त्यामुळे पत्नी डिंपल यादव यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कन्नौज मतदारसंघातून पुन्हा तिकीट दिले जाणार नाही, असे सांगून अखिलेश म्हणाले की, राजनाथसिंह, कल्याणसिंह, रमणसिंह, शिवराज चौहान हे भाजपचे नेतेच ‘घराणेशाही’ करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेक जण राजकारणात आहेत. माझी पत्नी आता निवडणूक लढवणार नाही, त्यांनीही तसे उदाहरण घालून द्यावे. जर त्यांनी तसे केले नाही आणि फक्त आमच्यावरच आरोप केले तर मात्र आम्ही आमचा निर्णय बदलू शकतो.

सपा-बसपा युती आणखी भक्कम झाली
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने एक अधिक जागा मिळवली असली तरी त्या पक्षाचा दलितविरोधी चेहरा उघड झाल्यामुळे हा विजय भाजपवरच उलटणार आहे, असा दावा करून अखिलेश म्हणाले की, भाजपने धनशक्तीचा वापर करून नववी जागा जिंकली. त्यामुळे गरिबांविरुद्ध पैशाचा आणि सत्तेचा वापर करण्याचे भाजपचे धोरण उघड झाले आहे. दलित उमेदवार भीमराव आंबेडकर यांना विजयी न होऊ देण्याचा कट भाजपने आखला असला तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपा एकजूट आणखी भक्कम झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments