Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेश‘नथुराम गोडसेनेच केली महात्मा गांधींची हत्या, फेरतपासाची गरज नाही’

‘नथुराम गोडसेनेच केली महात्मा गांधींची हत्या, फेरतपासाची गरज नाही’

नवी दिल्ली:  महात्मा गांधी यांच्या हत्येचा पुन्हा एकदा नव्याने तपास होणार नसल्याचे न्यायमित्रांनी (एमीकस क्युरी) सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी गांधी हत्याकांडाशी निगडीत विविध दस्तऐवजांचा तपास केला आणि गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केली. महात्मा गांधीची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून यात अज्ञात व्यक्तीचा हात नव्हता असे शरण यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

‘अभिनव भारत’चे पंकज फडणीस यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शरण यांना यासंबंधीचे निर्देश दिले होते. महात्मा गांधी यांची हत्या एका अज्ञात व्यक्तीने केली होती. त्या अज्ञात व्यक्तीनेच ‘चौथी गोळी’ झाडली होती. या चौथ्या गोळीचे रहस्य कधी सुटलेच नाही, असा दावा करत पुन्हा नव्याने याचा तपास व्हावा अशी मागणी फडणीस यांनी आपल्या याचिकेत केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शरण यांनी आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवला. वर्ष १९६९ मध्ये गृहमंत्रालयाला जीवनलाल कपूर चौकशी आयोगाने महात्मा गांधीच्या हत्येसंबंधी विस्तृत अहवाल सोपवला होता. कपूर आयोगाच्या अहवालाचा सूक्ष्म अभ्यास तसेच हत्येसंबंधी विविध पैलूंचाही अभ्यास करून हा अहवाल तयार केल्याचे शरण यांनी माध्यमांना सांगितले. महात्मा गांधी यांनी अखेरच्या वेळी जे कपडे परिधान केले होते. त्याचाही तपास शरण यांनी केला होता. दि. ३० जानेवारी १९४८ ला हत्येच्या एक दिवस आधी महात्मा गांधींनी परिधान केलेले कपडे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. महात्मा गांधीजींच्या हत्येत नथुराम गोडसेशिवाय अन्य व्यक्तीचा समावेश असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही, असे शरण यांनी आपल्या अहवालात म्हटले. सुमारे चार हजार पानांची तपासणी करुन हा अहवाल सादर कऱण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्या. एस.ए. बोबडे आणि न्या. एल.नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ७ ऑक्टोबर २०१७ मध्ये शरण यांनी न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments