Thursday, March 28, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींनी आधी कोरोनावरील लस घ्यावी : नवाब मलिक

पंतप्रधान मोदींनी आधी कोरोनावरील लस घ्यावी : नवाब मलिक

मुंबई: देशात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

करोनावरील लसीची प्रतीक्षा आता संपली आहे. आजपासून अवघ्या चारच दिवसांनंतर १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यदलातील जवान यांना लस दिली जाणार आहे. यावर बोट ठेवत मलिक यांनी राष्ट्रवादीची मागणी पुढे केली आहे.

करोनावरील लसीकरण सुरू होत असताना याबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल, असे नवाब मलिक यांनी नमूद केले आहे.

लसीकरणासाठी सर्व यंत्रणा सज्ज

देशात गेल्या दहा महिन्यांपासून करोनाचा कहर सुरू आहे. सध्या करोनाची स्थिती नियंत्रणात असली व रुग्णसंख्या वेगाने कमी होत असली तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. अशावेळी करोना लसीकरणाची बातमी सर्वांनाच सुखावणारी आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय बैठक पार पडली.

या बैठकीत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील तयारीचा आढावा घेण्यात आला व लसीकरणाला प्रत्यक्ष १६ जानेवारीपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व अन्य अशा ३ कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिक व व्याधीग्रस्तांना लस देण्यात येणार आहे. या बैठकीनंतर लसीकरणाच्या तयारीला वेग आला असून सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दुसरीकडे सीरम इन्स्टिट्युटमधूनही सूत्रांच्या हवाल्याने महत्त्वाची माहिती हाती आली आहे. केंद्र सरकारने सीरमला कोविशिल्डच्या १.१ कोटी डोसची पहिली ऑर्डर दिली असून २०० रुपये प्रतिडोस या दराने ही लस सरकारला उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments