Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेश‘पंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू नायडूंचा फोन न उचलणे दुर्दैवी’- अहमद पटेल

‘पंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू नायडूंचा फोन न उचलणे दुर्दैवी’- अहमद पटेल

Ahmed Patel

नवी दिल्ली:  तेलुगू देशम पक्षाने (टीडीपी) केंद्र सरकार आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देत नसल्याचे कारण पुढे करत राष्ट्रीय लोकशाही (एनडीए) आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला फोनही घेतला नसल्याची खंत व्यक्त केली.यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.पटेल म्हणाले की, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोन पंतप्रधान उचलत नाहीत, ही खरच दुर्दैवी गोष्ट आहे.

पंतप्रधानांची ही भूमिका आंध्र प्रदेशच्या जनतेसाठी योग्य नसल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींवर अहमद पटेल यांनी निशाणा साधला.

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी टीडीपीच्या या भूमिकेवर टीका केली. हे खूप उशिराने केले आहे. टीडीपी मागील ४ वर्षांपासून भाजपाचा सहयोगी पक्ष होता आणि आंध्र प्रदेशच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. राज्यातील जनतेचा ‘मूड’ पाहून टीडीपीने हा राजकीय निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिराने चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन एनडीएतून टीडीपी बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या टीडीपीने हतबल होत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून केंद्र सरकारकडे आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली होती. मात्र, याकडे सरकारने दुर्लक्ष केले. आम्ही गेल्या ४ वर्षांपासून संयम दाखवला. दरम्यान, सर्व प्रकारे आम्ही केंद्र सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचा फायदा झाला नाही. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीतही गेलो. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे एकूणच सरकार आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास उत्सुक नसल्याचे आमच्या लक्षात आले. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधानांना कळविण्यासाठी मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फोनवर सुद्धा आले नाहीत,’ अशी व्यथा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments