Thursday, March 28, 2024
Homeदेशहुकूमशहांची नावं ‘M’वरूनच का सुरू होतात?; राहुल गांधींची खोचक टीका

हुकूमशहांची नावं ‘M’वरूनच का सुरू होतात?; राहुल गांधींची खोचक टीका

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. आता राहुल गांधी यांनी एक ट्विट करून मोदींवर अत्यंत खोचक टीका केली आहे. जगातील बहुतेक हुकूमशहांची नावे ‘एम’ या अक्षरानेच का सुरू होतात? असा सवाल राहुल यांनी केला आहे. हा सवाल करतानाच राहुल यांनी एम अक्षरांवरून नावं सुरू होणाऱ्या काही हुकूमशहांची नावंही ट्विटमध्ये लिहिली आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. जगातील बहुतेक हुकूमशहांची नावं ‘एम’ने का सुरू होतात? असा सवाल त्यांनी केला आहे. मार्कोस, मुसोलिनी, मिलेसोविक, मुबारक, मोबुतू, मुशर्फ आणि मिकोम्बरो आदी हुकूमशहांची नावंही त्यांनी ट्विट केली आहेत.

सरकारने मागे हटावं

दरम्यान, राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली आहे. मी शेतकऱ्यांना ओळखतो. शेतकरी मागे हटणार नाहीत. सरकारलाच मागे हटावे लागणार आहे. त्यामुळे नंतर माघार घेण्यापेक्षा सरकारने आताच माघार घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी त्यांनी सरकार शेतकऱ्यांशी संवाद का साधत नाही? असा सवालही केला. कायदा मागे घ्यावा हाच शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. मग कायदे का मागे घेतले जात नाही? असा सवालही त्यांनी केला.

एक फोन कॉल करा म्हणजे काय?

यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही टीका केली. अर्थसंकल्पातून गरीबांना काहीही मिळणार नाही. केवळ काही उद्योजकांचाच या अर्थसंकल्पातून फायदा होणार आहे, असा सवालही त्यांनी केला. आधी नोटबंदीने मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली. त्यानंतर कोविडमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. अशा काळातही शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था सावरली. त्यांनीच देशाला वाचवलं आणि आज त्यांनाच वाऱ्यावर सोडण्यात येत आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना एक फोन कॉल करा म्हणून सांगत आहे. एक फोन कॉल करा म्हणजे काय? शेतकऱ्यांना कायदाच नको आहे, फोन करण्याचा संबंध येतो कुठे? असही त्यांनी सांगितलं.

ही कोणती देशभक्ती?

लडाखमध्ये कडाक्याची थंडी आहे. तिथे सैनिक जागता पहारा देत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी खर्च करायला सरकारकडे पैसे नाहीत. ही कोणती देशभक्ती आहे? असा सवालही त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments