मोदींच्या दौऱ्यावर ‘राहुल’चा खोचक ट्विट

- Advertisement -

गांधीनगर– पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदी जवळपास सात लाख कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी काय बोलणार याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खोचक टीका केली आहे. ‘हवामान अंदाज- निवडणुकांच्या आधी होणार आश्वासनांचा पाऊस’ अशा आशयाचं खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. याच निवडणुकांच्या निमित्ताने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडताना दिसत नाहीत. राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर असताना त्यांनी मोदींवर कडाडून टीका केली होती. आज पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरात मॉडेल समोर ठेवून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याचमुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आणि भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

- Advertisement -

ट्रम्प यांच्या ट्विटवरूनही केली मोदींवर टीका
रविवारीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासंबंधीच्या ट्विटवरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. मोदीजी, घाई करा. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा गळाभेट हवी आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली होती.

गुजरातमध्ये मोदी सात लाख कार्यकर्त्यांना करणार संबोधित
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गुजरात गौरव यात्रा समापन संमेलनाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. या संमेलनासाठी जवळपास ७ लाख कार्यकर्ते एकत्र येणार असल्याचा दावा भाजपानं केला आहे. यापूर्वी अशा पद्धतीनं कोणत्याही पक्षाच्या मेळाव्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र जमलेले नाहीत, त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे भाजपाचं म्हणणं आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भट गावात गुजरात गौरव महासंमेलनात जवळपास सात लाख भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अन्य नेतेमंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. गेल्या आठवड्यात मोदी यांनी राजकोट, वडनगर, गांधीनगरसारख्या परिसरात अनेक योजनांचे भूमिपूजन केले तर काही योजनांचा शुभारंभदेखील केला.

- Advertisement -