Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
HomeदेशTRP Scam Case: अर्णव गोस्वामी अडकणार; पार्थो दासगुप्तानं कोर्टात दिला 'हा' जबाब

TRP Scam Case: अर्णव गोस्वामी अडकणार; पार्थो दासगुप्तानं कोर्टात दिला ‘हा’ जबाब

मुंबई: ‘टीआरपी घोटाळ्यात मुख्य आरोपी अर्णब गोस्वामी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक हे आहेत’, अशी माहिती या घोटाळ्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला ‘बार्क’चा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्तातर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, दासगुप्ताचा जामीन अर्ज फेटाळण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण प्रत उपलब्ध न झाल्याने पुढील सुनावणीपूर्वी ती सादर करण्याचे निर्देश देऊन उच्च न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर २ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली.

मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालय व सत्र न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्याने दासगुप्ताने अॅड. शार्दुल सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.

दासगुप्ता २४ डिसेंबरपासून अटकेत आहे. मागील आठवड्यात प्रकृती अचानक बिघडल्याने दासगुप्ताला नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. २२ जानेवारीला त्याला पुन्हा तुरुंगात हलवण्यात आले.

त्यानंतर दासगुप्ताच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती अॅड. सिंग यांनी केली होती. त्याप्रमाणे न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली.

‘या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळालेला आहे. बार्कच्या सीओओचाही त्यात समावेश आहे. कनिष्ठ न्यायालयांनी केवळ दासगुप्ताला जामीन नाकारला आहे’, असे सिंग यांनी न्या. नाईक यांच्या निदर्शनास आणले.

तेव्हा, ‘या प्रकरणात दासगुप्ताची भूमिका काय आहे आणि पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे मुख्य आरोपी कोण आहे?’, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली.

त्यावर ‘अर्णव गोस्वामी मुख्य आरोपी आहे’, असे उत्तर सिंग यांनी दिले. आरोपपत्राची प्रत सादर करण्यास न्यायमूर्तींनी सांगितले असता, ही प्रत खूप मोठी असल्याचे सिंग यांनी सांगितले. त्यामुळे न्यायमूर्तींनी आरोपपत्रातील दासगुप्ताशी संबंधित भाग पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments