गुजरातमध्ये भाजपला ‘डबल’ झटका!

- Advertisement -

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून भाजपाला डबल झटका बसला आहे. गेल्या दोन दिवसात राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली आहे. आज सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं.

मला फक्त लॉलिपॉप ऑफर केला जात असून, आश्वासन पुर्ण केलं जात नसल्याने राजीनामा देत असल्याचं निखिल सवानी बोलले आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत. ‘नरेंद्र पटेल यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचं ऐकलं. त्यामुळे मी प्रचंड निराश झालो आहे. मी आज भाजपा सोडत आहे. मी नरेंद्र पटेल यांचं अभिनंदन करतो. एका गरिब कुटुंबातून आले असतानाही त्यांनी भाजपाची एक कोटींची ऑफर नाकारली’, असं निखिल सवानी बोलले आहेत.

यावेळी बोलताना निखिल सवानी यांनी आपण राहुल गांधींना भेटणार असल्याचं सांगितलं. ‘काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ घेणार असून, त्यांना भेटल्यानंतर माझी पुढील वाटचाल स्पष्ट करेन’, असं निखिल सवानी बोलले आहेत. ‘भाजपात प्रवेश करण्यासाठी मला कोणत्याही पैशांची ऑफर नव्हती. फक्त लॉलिपॉप दाखवण्यात येत असून, आश्वासन पुर्ण केली जात नसल्यानेच मी राजीनामा देत आहे’, असं निखिल सवानी यांनी सांगितलं आहे. ‘मी नरेंद्र पटेल यांच्याशी सहमत आहे. पैशांची ऑफर दिली जात असल्याचं मी अनेकांकडून ऐकलं आहे’, असंही निखील सवानी यांनी सांगितलं.

- Advertisement -
- Advertisement -