आठ वर्षाच्या मुलाला चिरडून योगींच्या मंत्र्याचा ताफा रवाना

- Advertisement -

गोंडा – उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्या ताफ्यातील गाड्यांनी एका निरपराध मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा करनैलगंजकडून परसपूरच्या दिशेला जात असताना शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. यात एका मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर गाड्यांचा ताफा न थांबताच निघून गेल्याचा आणि पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

गोसाई पुरवा येथील रहिवासी विश्वनाथ यांचा ८ वर्षांचा मुलगा शिवा रस्त्याच्या कडेला खेळत होता. त्यावेळी मंत्री राजभर यांच्या गाड्यांचा ताफा तेथून गेला. आवाज ऐकून मुलाने पळण्याचा प्रयत्न केला परंतू ताफ्यातील एका गाडीने त्याला चिरडले. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मंत्र्यांचा गाडी ताफा न थांबताच निघून गेला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी जबरदस्तीने मृतदेह हलवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एका तासाच्या वादानंतर पोलिसांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला.

करनैलगंज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सदानंद सिंह यांनी याबाबत बोलताना म्हटले की, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येईल. या घटनेची दखल घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालकांना या घटनेचा सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. तसेच मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -