Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशहार्दिक पटेलनं राहुल गांधींसमोर ठेवल्या या तीन अटी

हार्दिक पटेलनं राहुल गांधींसमोर ठेवल्या या तीन अटी

अहमदाबाद – गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून  या बैठकीच्या वृत्ताचे खंडन करण्यात येत आहे. तसेच हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांनीही अशाप्रकारच्या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.

राहुल गांधींना भेटायचं असल्यास सर्वांसमोर भेट घेईन, असे सांगत हार्दिक पटेलनंही हे वृत्त फेटाळले आहे.  अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली.

हार्दिक पटेलच्या तीन अटी 
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्या भेटीसंदर्भातील वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, हार्दिक पटेलनं पाटीदार समाजाच्या अनेक अटी या भेटीदरम्यान राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. पहिली अट पाटीदार समाजाचे आरक्षण, दुसरी अट विजय मिळाल्यास सत्तेत भागीदार आणि तिसरी राष्ट्रद्रोह प्रकरणासंबंधी आहे.  काँग्रेस सत्तेत आल्यास कशा प्रकारे आणि संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार पाटीदार समाजाला आरक्षण देण्यात येईल,हे काँग्रेसनं स्पष्ट करावं असे हार्दिकचं म्हणणं आहे. शिवाय, काँग्रेस जर सत्तेत आली तर पाटीदारांना सत्तेत किती टक्के सहभाग मिळणार.  शिवाय, पाटीदार समाजाच्या आंदोलकांविरोधातील राष्ट्रद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि पाटीदार समाजातील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हार्दिकनं केली आहे.

अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्याच हॉटेलमधील एका खोलीत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रविवारी रात्री ११.५३ वाजल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी ४.१४ वाजेपर्यंतच्या ५ व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पटेल हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर येताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकनं राहुल गांधींव्यतिरिक्त सोमवारीच भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या निखिल सवानी, अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिन सोलंकीचीही भेट घेतली. दरम्यान, हार्दिक पटेलला या सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात विचारणा केली असता त्यानं सांगितले की, मी राहुल गांधींची भेट घेतलेली नाही. मात्र अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्षांसोबत पाटीदार समुदायाला प्रभावित करणा-या मुद्यांवर चर्चा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments