गाडी २० सेकंद लवकर सुटली म्हणून रेल्वेने मागितली माफी

- Advertisement -

टोकियो – भारतामध्ये लोकल गाड्या अर्धा अर्धा तास उशीरानं धावतात आणि रोजच्या रोज रेल्वे अनाउन्समेंटद्वारे प्रवाशांप्रती दिलगिरी व्यक्त करते. अत्यंत वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या जपानमध्ये उलट प्रकार घडला आहे. जपानच्या राजधानीत रेल्वे वाहतूक करणाऱ्या एका खासगी कंपनीने एक ट्रेन २० सेकंद लवकर सोडल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.

गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, टोकियोच्या उत्तर भागातील मिनामी नागारेयामा या रेल्वेस्थानकातून सुकुबा एक्स्प्रेस सुटण्याची वेळ ९ वाजून ४४ मिनिटं व ४० सेकंद अशी आहे. मात्र, मंगळवारी या गाडीने ९ वाजून ४४ मिनिटं व २० सेकंद झालेले असताना फलाट सोडला. भारतामध्येगाडी वेळेवर सुटली तर धक्का बसतो अशा पार्श्वभूमीवर जपानकडून बोध घ्यावा अशी ही घटना आहे. ट्रेन चालवणाऱ्या कंपनीने आम्हाला मनापासून वाईट असल्याचं व ट्रेन ठरलेल्या वेळीच सुटायला हवी होती अशी भावना व्यक्त केली आहे.

- Advertisement -

यामुळे आमच्या ग्राहकांना त्रास सोसावा लागला असून आम्ही त्यांची माफी मागतो अशा शब्दांत मेट्रोपॉलिटन इंटरसिटी रेल्वे कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. ट्रेनच्या वाहकाने टाइमटेबल नीट तपासले नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आल्याचेही रेल्वे कंपनीने प्रेस रिलीजमध्ये नमूद केले आहे. विशेष म्हणजे ही गाडी सुटल्यानंतर ४ मिनिटांनी दुसरी गाडी होती. असे असतानाही, २० सेकंद गाडी लवकर सुटल्यामुळे ज्या प्रवाशांना प्रवासासाठी ४ मिनिटांच्या गाडीसाठी वाट बघावी लागली त्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे. जपानच्या ट्रेनच्या वक्तशीरपणाबद्दल जगभरात कौतुक करण्यात येतं. असं सांगण्यात येतं की घड्याळात फक्त तास नी मिनिटंच नसतात, तर सेकंदपण असतात हे जपानकडून शिकावं.

- Advertisement -