Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेश‘मनमोहनसिंग पाकसोबत कट रचत असताना सरकार झोपले होते का?’- मल्लिकार्जुन खरगे

‘मनमोहनसिंग पाकसोबत कट रचत असताना सरकार झोपले होते का?’- मल्लिकार्जुन खरगे

नवी दिल्ली: जेव्हा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग दिल्लीती बसून पाकिस्तानबरोबर कट रचत होते, तेव्हा केंद्र सरकार झोपले होते, काय असा थेट सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला केला आहे. निवडणुकीत निव्वळ प्रचारासाठी भाजपने खोटा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपने डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांना भेटून नरेंद्र मोदींविरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने तेव्हाही हा आरोप फेटाळला होता. या आरोपानंतर काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी मोदींचा निषेध केला होता. त्याचे पडसाद आता लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात उमटत आहेत. मोदींनी माजी पंतप्रधानांचा अपमान करून देशाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मनमोहनसिंग हे देशाचे माजी पंतप्रधान होते. त्यांच्याविरोधात केलेल्या आरोपाबाबत मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्ष करत आहेत. विरोधकांनी ही मागणी करत सोमवारी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले होते.

हाच मुद्दा खरगे यांनी पुन्हा उपस्थित करून केंद्र सरकार व भाजपच्या कार्यशैलीवर टीका केली. खरगे म्हणाले, मनमोहनसिंग जेव्हा पाकिस्तानबरोबर कट रचत होते. तेव्हा केंद्र सरकार झोपले होते का? मनमोहनसिंग यांच्याविरोधात अजून गुन्हा का दाखल केला नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी हा खोटा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरोधात केलेल्या नाहक आरोपाबाबत मोदींनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेसने लोकसभेतून सभा त्याग केला. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत लोकसभाध्यक्षांच्या वेलमध्ये धाव घेतली. निवडणुका आता संपल्या आहेत. आता हा मुद्दा उपस्थित करण्यास मी परवानगी देऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिले. यावर काँग्रेसच्या सदस्यांनी ‘प्रधानमंत्री माफी माँगो’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments