Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशसंविधानात बदल करण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत'

संविधानात बदल करण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत’

बंगळुरू – केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंत कुमार हेगडे यांनी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद ओढवून घेत भाजपलाच अडचणीत आणले आहे. वेळोवळी संविधानात बदल झाले आहेत आणि आम्ही सुद्धा असे बदल करणार असून त्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले आहे.

धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्यांना स्वतःचे मूळ माहिती नाही. संविधानानेच त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण, याच संविधानात वारंवार बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हीही असे बदल करू हे त्यांनी लक्षात ठेवावे. कोप्पल जिल्ह्यातील कुकानूर शहरात ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, जर एखादा व्यक्ती स्वतःला मुस्लिम, हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध म्हणवून घेत असेल तर त्याचा मला अभिमान वाटेल. कारण त्याच्या धर्माशी आणि जातीशी त्याची बांधिलकी आहे. परंतु, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे कोण आहेत? त्यांना स्वतःचे मूळही ठाऊक नाही. पाच वेळा लोकसभेवर निवडून आलेले अनंत कुमार हेगडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments