‘मिथून चक्रवर्ती भाजपात दाखल होताच दिला ‘हा’ इशारा

- Advertisement -
west-bengal-assembly-election-2021-i-am-a-cobra-one-bite-is-enough-mithun-chakraborty
west-bengal-assembly-election-2021-i-am-a-cobra-one-bite-is-enough-mithun-chakraborty

कोलकाता: अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. “कुणी जर हक्क हिसकावून घेत असेल, त्याच्या हक्कासाठी उभा राहिन. मी कोब्रा आहे. मी चावलो, तर तुम्ही फोटोसारखेच होणार. माझा एक दंशही पुरेसा आहे,” असा इशारा चक्रवर्ती यांन दिला.

मागील काही दिवसांपासून मिथून चक्रवर्ती हे पुन्हा राजकारणात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला बळ मिळालं होतं. भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात असतानाच आज मिथून चक्रवर्ती यांनी कमळ हाती घेतलं.

- Advertisement -

मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेल्या कोलकातातील ब्रिगेड मैदानातील व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना मिथून चक्रवर्ती म्हणाले, “मी कोब्रा आहे. कुणी जर हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहिल. माझा एक दंश पुरेसा आहे. मी बंगाली आहे आणि जो कुणी इथे वाढला आहे, त्याचा भूमीवर अधिकार आहे. मी ग्वाही देतो की, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेल,” असं मिथून चक्रवर्ती म्हणाले.

“मी मूळचा उत्तर कोलकातातील जोराबागन या एका छोट्या परिसरातला आहे. माझं एक स्वप्न होतं की, खूप मोठं व्हावं. पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. मी याचीही कधी कल्पना केली नव्हती की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळेल,” असं मिथून यांनी सांगितलं.

२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here