पटेलांना आरक्षण मग मुस्लिम समाजाला का नाही?- ओवेसी

- Advertisement -

महत्वाची….
१.मुस्लिमांची नेहमीच सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांकडून फसवणूक २. काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यास तयार मागासलेल्या मुस्लिम समाजाला का नाही? ३. मुस्लिम समाज हा राजकीय दृष्ट्या दुबळा


हैदराबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानंतर अनेक विरोधकांनी काँग्रेस तसेच पाटीदार समाजाचा नेता असणाऱ्या हार्दिक पटेल यांच्यावर टिका करण्यास सुरुवात केली. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस आणि हार्दिक यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याच्या मुद्द्यावरून मुसलमानांच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यास तयार आहे. पण सामाजिक तसेच शैक्षणिक आघाड्यांवर मागासलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास तयार नसल्याबद्दलची नाराजी त्यांनी ट्विटवरून व्यक्त केली.

काँग्रेसला पाठिंबा देत असल्यासंदर्भात हार्दिक पटेलच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना ओवेसी यांनी ट्विटवरून काँग्रेसवर निशाणा साधला. हार्दिक पटेलने काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यास तयार असल्याचे सांगितले मात्र सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुसलमानांना आरक्षण द्यायला काँग्रेस तयार नाहीत. मुस्लिम समाज राजकीय दृष्ट्या दुबळा आहे. आणि दुबळ्या लोकांना गप्प राहण्यास सांगण्यात येते, असे ओवेसी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. ही मुसलमानांसाठी स्टॉकहोम सिंड्रोमसारखी स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे अपहरण होणाऱ्या व्यक्तीला त्याचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्याबद्दल सहानभूती असते. याचाच अर्थ नेहमीच सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांकडून फसवणूक होत असली तरी मुस्लिम समाज त्यांनाच निवडून देतो. अशीही नाराजी ओवेसी यांनी व्यक्त केली.

- Advertisement -
- Advertisement -