Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशगुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार : हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार : हार्दिक पटेल

अहमदाबाद: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी जाहीर केले.  काँग्रेसने पाटीदार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान मी राहुल गांधी यांची भेट घेणार आहे.  त्यानंतर पाठिंब्याबाबत अधिकृत घोषणा करु, असे त्यांनी सांगितले.

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना नुकतीच काँग्रेसने ऑफर दिली होती. हार्दिक पटेल यांना उमेदवारी देण्याची तयारीही काँग्रेसने दर्शवली होती. तर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ते काँग्रेसला पाठिंबा देणार अशी चर्चा होती. अखेर हार्दिक पटेल यांनी मौन सोडले. निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पाटीदार समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान भेट घेणार आहे. या भेटीत राहुल गांधींही आमच्या मागण्या मान्य करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या भेटीनंतरच अधिकृत घोषणा करु असे पटेल यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये ओबीसी मतदारांचे प्रमाण ४० टक्के आहे. तर पाटीदार समाजाचे प्रमाण १२ टक्के असून या समाजालाही आरक्षण द्यावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने आंदोलन केले होते. पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे गुजरातमधील राजकीय चित्र बदलले आहे. अल्पेश ठाकोर यांच्यापाठोपाठ हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपची वाट बिकट झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments