वांद्रेत इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग

मुंबई– वांद्रे पश्चिमेकडील रहिवासी इमारतीला आग लागली आहे. वांद्रेमधील माऊंट मेरी चर्चजवळ ही इमारत असून इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आग लागली आहे. ‘ला मेर’  इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या अकरा गाड्या आणि एक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)

कॉमन मॅन ते मालगुडी डेज, आर के लक्ष्मण यांना सलाम!

मुंबई: ख्यातनाम व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’ म्हणून परिचीत असलेले आर के लक्ष्मण यांची आज ९६ वी जयंती. आर.के.लक्ष्मण यांनी आपल्या व्यंगित्रातून वेगळा ठसा उमटविला होता. आर के लक्ष्मण हे ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून घराघरात पोहोचले.

कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली. लक्ष्मण यांचं ‘कॉमन मॅन’ हे कार्टून अनेक दशक चर्चेत राहिलं. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केल्याने, जनतेनेही ते उचलून धरलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच आर के लक्ष्मण यांचा अभिमानाने उल्लेख करत. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आपल्या भाषणात आर के लक्ष्मण यांचा उल्लेख करतात.

आर के लक्ष्मण यांची कारकीर्द

रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण (आर. के. लक्ष्मण) यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९२१ रोजी झाला होता. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून जगभरात त्यांची नोंद घेतली गेली.

आर के लक्ष्मण यांची १९५० पासून सुरू केलेली कार्टून कला गेल्या काही वर्षांपर्यंत सुरुच होती. उतारवयातही त्यांनी प्रत्येक पीढीसोबत स्वत:ला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं. मात्र अखेरच्या काही दिवसात प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा कुंचला शांत होता. अखेर २६ जानेवारी २०१५ रोजी हा कुंचला कायमचा थांबला.

टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात आर. के. लक्ष्मण यांचं ‘यू सेड इट’ या नावाने कार्टून प्रसिद्ध होत असे.  १९५१ मध्ये त्यांनी टाईम्स ऑफ इंडियात या व्यंगचित्र मालिकेला सुरुवात केली होती. स्थानिक वृत्तपत्रांमधून व्यंगचित्रकार म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या आर. के. लक्ष्मण यांची नोंद जगभरातल अव्वल व्यंगचित्रकार म्हणून केली जाते.

टाईम्स ऑफ इंडियासह द स्टँड, पंच, बायस्टँड, वाईड वर्ल्ड आणि टिट-बिट्समध्येही त्यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहेत. जगप्रसिद्ध ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचा त्यांच्यावर प्रभाव होता, असे ते नेहमी सांगत असत.
आर के लक्ष्मण यांचा अल्पपरिचय

२४ ऑक्टोबर १९२१ रोजी म्हैसूरमध्ये जन्म

मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे म्हैसूरच्या विद्यापीठातून बी. एची पदवी

मुंबईच्या फ्री प्रेस जर्नलमध्ये पहिली पूर्णवेळ नोकरी, याठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी होते.

तब्बल ५० वर्षे त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये व्यंगचित्र रेखाटली.

आर के लक्ष्मण यांनी चितारलेला ‘कॉमन मॅन’ सर्वांच्याच काळजाला भिडला.

एशियन पेंटसाठी काढलेलं गट्टूचं रेखाचित्रही लोकप्रिय.

अनेक कथा, कादंबऱ्या आणि प्रवासवर्णनांचं लेखन

आर. के. लक्ष्मण यांनी ‘मालगुडी डेज’साठी अनेक रेखाचित्र काढली.

आर के लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून अनेक राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य

१९७१ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

१९८४ साली मॅगसेसे पुरस्काराने आर. के. लक्ष्मण यांचा गौरव

२००५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला

रिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात!

मुंबई : प्रतिभा असली तर गरिबी तुमच्या यशाच्या आड कधीच येत नाही, असं म्हटलं जातं. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी मोहम्मद सिराजची निवड होणं हे त्याचंच एक उदाहरण आहे. वडील रिक्षाचालक, गरिबी पाचवीला पुजलेली, परंतु सिराजच्या कामगिरीमध्ये गरिबी कधीच अडचण ठरली नाही, किंबहुना वडिलांनी ती येऊ दिली नाही.

रिक्षाचालकाचा हा मुलगा आता विराट कोहली आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गजांसोबत टीम इंडियाची जर्सी परिधान करुन खेळताना दिसेल. बीसीसीआयने सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यात विराट कोहली, लोकेश राहुल, शिखर धवन, मनिष पांडे या खेळाडूंचा समावेश आहेच. पण या मालिकेसाठी संघात जलद गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फलंदाज श्रेयस अय्यर या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

कोण आहे मोहम्मद सिराज?
मूळचा हैदराबादचा असलेल्या मोहम्मद सिराजसाठी ही बाब अगदी स्वप्नवत आहे. सिराजच्या आयुष्याला पहिल्यांदा वळण मिळालं ते आयपीएलच्या लिलावादरम्यान. या स्पर्धेच्या दहाव्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला २.६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. २३ वर्षीय सिराजने हैदराबादसाठी शानदार कामगिरी केली होती. त्याने ६ सामन्यात १० विकेट्स घेतल्या होत्या.

वडील रिक्षाचालक, मात्र गरिबी करिअरच्या आड नाही!
सिराजचे वडील मोहम्मद गौस रिक्षाचालक होते. परंतु आर्थिक परिस्थिती कधीही सिराजच्या क्रिकेट करिअरमध्ये अडथळा बनली नाही. वडिलांनी आर्थिक तंगी कधीही मुलाच्या क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नाच्या आड कधीही येऊ दिली नाही. अनेक अडणींचा सामना करत, रिक्षा चालवत ते मुलासाठी महागड्या किट आणून देत असत. सिराजने गरिबी अतिशय जवळून पाहिली आहे. त्यामुळे तो घराजवळच्या गरुजू मुलांना मोफत क्रिकेट कोचिंग देतो. मोहम्मद सिराज कधीच कोचिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं नाही, हे विशेष.

क्रिकेटमधील पहिलं बक्षीस होतं ५००रुपये!
सिराजने तामिळनाडू प्रीमियर लीगमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. क्रिकेट करिअरची पहिली कमाई ५०० रुपयांची होती, असं मोहम्मद सिराजने एका मुलाखतीत सांगितलं. क्लबचा सामना होता आणि माझे मामा संघाचे कर्णधार होते. मी या सामन्यात २५ षटकांमध्ये २० धावांच्या मोबदल्यात ९ विकेट्स घेतल्या. माझ्या कामगिरीवर मामा खूश झाले होते. आम्ही हा सामना जिंकल्याने मामांनी मला बक्षीस म्हणून ५०० रुपये दिले होते. सिराजने १४ प्रथम श्रेणी सामन्यात ५३ आणि १३ लिस्ट-ए क्रिकेट सामन्यात २० विकेट्स घेतल्या आहेत.

वीसाव्या वर्षी पहिल्यांदा क्रिकेट बॉल हातात
वयाच्या वीसाव्या वर्षापर्यंत मोहम्मद सिराज क्रिकेट बॉलने (सीझन बॉल) खेळला नव्हता. चारमिनार क्रिकेट क्लबकडून तो पहिल्या क्रिकेट बॉलने खेळला. राज्यस्तरीय क्रिकेट निवडीसाठी त्याने पाच विकेट्स घेतल्या. मात्र रणजी पदार्पणात हैदराबाद संघाकडून खेळताना त्याला १०८ धावांच्या मोबदल्यात केवळ एकच विकेट घेतली.

परंतु २०१६-१७ च्या मोसमात त्याने उत्तम कामगिरी करत, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.

जुलै २०१७ मध्ये भारत ‘अ’ संघासाठी त्याची निवड झाली. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तान ‘अ’विरुद्धच्या सामन्यात त्याने ४९ धावात तीन विकेट्स घेतल्या. तर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड ‘अ’ संघाविरोधात त्याची कामगिरी होती  २/२७ धावा.

२०१५ मध्ये रणजीत पदार्पण
मोहम्मद सिराजने २०१५ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. ९ सामन्यात ४१ विकेट्स घेऊन तो चर्चेत आला होता. या कामगिरीमुळे मोहम्मद सिराज लोकांच्या नजरेत आला. त्यानंतर सिलेक्टर्सनीही त्याची इराणी कपसाठी निवड केली होती. आता मोहम्मद सिराजची टीम इंडियात निवड झाली आहे. टी-20 मालिकेतही तो उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष देण्याचा आईचा सल्ला
गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या मोहम्मद सिराजला त्याची आई कायमच ओरडत असे. मोठ्या भावाप्रमाणे अभ्यासाकडे लक्ष द्यावं, असं तिचं म्हणणं असायचं. मोहम्मद सिराजचा मोठा भाऊ मोहम्मद इस्माईल सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.

आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय!
सिराजला आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. वडील मोहम्मद गौस आणि आई शबाना बेगम यांच्यासाठी हैदराबादच्या पॉश परिसरात घर घेण्याचं सिराजचं स्वप्न आहे.

हार्दिक पटेलनं राहुल गांधींसमोर ठेवल्या या तीन अटी

अहमदाबाद – गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून  या बैठकीच्या वृत्ताचे खंडन करण्यात येत आहे. तसेच हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांनीही अशाप्रकारच्या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.

राहुल गांधींना भेटायचं असल्यास सर्वांसमोर भेट घेईन, असे सांगत हार्दिक पटेलनंही हे वृत्त फेटाळले आहे.  अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली.

हार्दिक पटेलच्या तीन अटी 
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्या भेटीसंदर्भातील वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, हार्दिक पटेलनं पाटीदार समाजाच्या अनेक अटी या भेटीदरम्यान राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. पहिली अट पाटीदार समाजाचे आरक्षण, दुसरी अट विजय मिळाल्यास सत्तेत भागीदार आणि तिसरी राष्ट्रद्रोह प्रकरणासंबंधी आहे.  काँग्रेस सत्तेत आल्यास कशा प्रकारे आणि संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार पाटीदार समाजाला आरक्षण देण्यात येईल,हे काँग्रेसनं स्पष्ट करावं असे हार्दिकचं म्हणणं आहे. शिवाय, काँग्रेस जर सत्तेत आली तर पाटीदारांना सत्तेत किती टक्के सहभाग मिळणार.  शिवाय, पाटीदार समाजाच्या आंदोलकांविरोधातील राष्ट्रद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि पाटीदार समाजातील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हार्दिकनं केली आहे.

अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्याच हॉटेलमधील एका खोलीत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रविवारी रात्री ११.५३ वाजल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी ४.१४ वाजेपर्यंतच्या ५ व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पटेल हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर येताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकनं राहुल गांधींव्यतिरिक्त सोमवारीच भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या निखिल सवानी, अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिन सोलंकीचीही भेट घेतली. दरम्यान, हार्दिक पटेलला या सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात विचारणा केली असता त्यानं सांगितले की, मी राहुल गांधींची भेट घेतलेली नाही. मात्र अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्षांसोबत पाटीदार समुदायाला प्रभावित करणा-या मुद्यांवर चर्चा केली.

आलिया आणि जॅकलिन चा दुरावा संपला!

आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यामधल्या कॅट फाईटची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. मात्र सध्या दोघींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन दोघींमधील कॅट फाईट संपल्याचे दिसते आहे. सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपला अनेकांनी सिद्धार्थची जॅकलिन फर्नांडिसची वाढलेली जवळीकता कारणीभूत ठरवली. ए जेंटलमॅन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकलिन आणि सिद्धार्थ हे एकमेकांच्या जवळ आले असल्याचे बोलले जात होते. चित्रपटातील गाण्यांमध्ये दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. यानंतर आलियाने सिद्धार्थला जॅकलिनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला असल्याचेदेखील बोलले जात होते. याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढली होती. सिद्धार्थ व जॅकच्या हॉट केमिस्ट्रीने केवळ पडद्यावरच आग लावली नाही तर रिअल लाईफमधील या दोघांची केमिस्ट्री लोकांच्याही ठसठसून डोळ्यांत भरली. दोघांनी चित्रपटात अनेक हॉट सीन्स दिले होते. ‘अ जेंटलमॅन’चे शूटींग सुरु असताना सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. शूटींग संपल्यानंतर दोघांचेही एकत्र डिनर, लाँग ड्राईव्ह असे सगळे एन्जॉय करणे सुरु असतानाच ही बातमी आलियाच्या कानावर गेली होती.   त्यानंतर दोघींमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या येत होत्या.

मात्र अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत दोघी एकमेंकींना मीठ मारताना दिसल्या. त्यामुळे दोघींमध्ये सगळे अलबेल असल्याचे दिसते आहे. ऐवढेच नाही तर आलिया जॅकलिनच्या गालावर किस करताना सुद्धा दिसते आहे. जॅकलिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वत : हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत जॅकलिनने अनेकांच्या तोडाला टाळं लावले आहे.

जॅकलिन लवकरच सलमान खानसोबत रेस 3 चित्रपट स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तर आलियाने काही दिवसांपूर्वी मेघना गुलजारच्या राजी चित्रपटाचे शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण केले आहे. यात ती एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारते आहे. यानंतर ती ब्रह्मस्त्र चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. यात अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या!

अंबरनाथ- तरुणीची हत्या करून तरुणाने हत्या केल्याचा प्रकार अंबरनाथच्या कानसई गाव परिसरात घडला आहे. मृत तरुणीचे नाव आचल महल्ले (२०) असून ती दिवा येथे राहणारी आहे. कानसई गावात राहणाऱ्या नत्राम वर्मा (२५) या विवाहित तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती असून त्यातूनच ती दिवाळीला त्याच्या घरी राहायला आली होती. यानंतर त्यांच्यात वाद होऊन नत्रामने तिची गळा आवळून हत्या केली आणि नंतर स्वतःही गळफास घेतला.

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह कुजलेला असल्यानं तिची हत्या किमान ३ दिवस आधी झाली असण्याची शक्यता आहे. यानंतर काल रात्री नत्रामने स्वतः तरुणीच्या कुटुंबियांना फोन करून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि मग स्वतः आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी यानंतर कानसई गावात धाव घेतली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

२०१९ची ‘ईद’ही ‘सलमान’ च्या नावावर बुक!

तुम्ही ‘भाईजान’सलमान खानचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, प्रतीक्षा संपलीय आणि सलमान खानचा पुढचा चित्रपट ‘भारत’ कधी रिलीज होणार, ते स्पष्ट झाले आहे. भाईजानने या चित्रपटाच्या रिलीजसाठीही नेहमीप्रमाणे ईदचे मुहूर्त निवडले आहे. २०१९ च्या ईदला सलमानचा ‘भारत’ हा सिनेमा रिलीज होईल. हा चित्रपट ‘Ode To My Father’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचे बोलले जात आहे.

पुढील वर्षी एप्रिलमध्ये ‘भारत’चे शूटींग सुरु होईल. या शूटींगची पूर्वतयारी सध्या सुरु आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हा चित्रपट रखडत चालला होता. सर्वप्रथम हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनीच दिग्दर्शित करावा, असे अतुलला वाटत होते. संतोषी यांनी ‘घायल’,‘घातक’,‘दामिनी’,‘अजब प्रेम की गजब कहानी’ असे काही हिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळे अतुल आणि सलमान दोघांनाही ‘भारत’साठी तेच हवे होते. पण संतोषींनी सलमानला बरीच प्रतीक्षा करवली. अखेर सलमाननेच आपली वाट बदलवून हा प्रोजेक्ट त्याचा आवडता दिग्दर्शक अली अब्बास जफरकडे सोपवला. तूर्तास सलमान आणि अली अब्बास जफर दोघेही ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहेत. सलमानचा सुपरडुपर हिट ‘सुल्तान’ हा चित्रपटही अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता.

आता कापूस विक्रीसाठी आधार नोंदणी- मुख्यमंत्री फडणवीस

अमरावती –  विदर्भातील पांढरे सोने असलेल्या कापूस खरेदी-विक्रीतील ‘दलालराज’ संपुष्टात आणण्यासाठी शेतक-यांना कापूस विक्रीसाठी आधार नोंदणी करावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन मागविल्यानंतर विरोधकांनी टीका केली. परंतु, एक कोटींपेक्षा अधिक शेतक-यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी यातील १० लाख शेतकरी अपात्र ठरविले. ही बाब डिजिटल नोंदणीमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या नावाने पात्र शेतक-यांची रक्कम इतरांनी लाटू नये, ही भावना आॅनलाइन अर्जप्रक्रियेमागे होती. तीन महिन्यांत शेतक-यांना कर्जमाफी दिली असून, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. गतवेळी तूर खरेदीप्रसंगी झालेली बदमाशी, आता कापूस खरेदीत होणार नाही. दलालांचा हस्तक्षेप टाळून कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांच्या कापसाला हमीभाव मिळावा, यासाठी विक्रीदरम्यान आधार नोंदणी अनिवार्य केले आहे. शासन शेतकरी, गरिबांसाठी विविध योजना, उपक्रम राबवीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले.

कार चोरीसाठी केली प्लास्टिक सर्जरी

पोलिसांना चकवा देण्यासाठी एका चोरट्याने चक्क प्लास्टिक सर्जरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ५०० हून अधिक कार चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या कुणाल उर्फ तनुजला पोलिसांनी अटक केली असून पोलीस चौकशीदरम्यान त्याने ही कबुली दिली.

दिल्लीत राहणारा तनुज १९९७ मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रीय झाला. यानंतर तनुज कार चोरी करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला आणि तोदेखील वाहनांची चोरी करु लागला. याच दरम्यान, तनुजला अमली पदार्थाचे व्यसन लागले. तनुजने स्वतःची टोळी तयार केली. टोळीतील प्रत्येक सदस्याला त्याने कार चोरी करण्याची पद्धत शिकवली. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने प्लास्टिक सर्जरीही केली आणि स्वतःचे नाव बदलून तनुजऐवजी कुणाल ठेवले. याच दरम्यान तो चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात गेला. त्याची जामिनावर सुटकादेखील झाली. तनुजच्या प्लास्टिक सर्जरीविषयी पोलिसांना माहितीदेखील नव्हती. मात्र, १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी कार चोरी करणाऱ्या कुणालला अटक केली तेव्हा कुणाल – तनुज हे चोरटे एकच असल्याचे उघड झाले. कुणालने यावर्षी फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत दिल्ली आणि लगतच्या राज्यांमधून तब्बल १०० कार चोरल्याची कबुली दिली. सध्या त्याच्याकडून १२ कार जप्त करण्यात आल्या असून उर्वरित कार जप्त करण्याची प्रक्रीया लवकरच सुरु केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

अशी होते चोरीच्या कारची विक्री
कार चोरी ते विक्री या संपूर्ण साखळीत तीन टीम कार्यरत असतात. यात प्रत्यक्षात जाऊन चोरी करणारे चोरटे, चोरी केलेल्या कारच्या इंजिनचे चेसिस नंबर बदलून त्यांची नोंदणी करणारे दलाल आणि चोरीच्या गाड्या विकणारे डिलर असे तीन टप्पे असतात.

संजय सांगतोय, मी अनिल पेक्षा फिट

अनिल कपूर हा आज बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेता मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरीही आज तो तितकाच तरुण दिसतो. बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर २४ या मालिकेद्वारे अनिल छोट्या पडद्यावर वळला. त्याच्या या मालिकेचा देखील प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता अनिलच्या पावला वर पाऊल ठेवून त्याचा भाऊ संजय कपूरने करिश्मा या मालिकेद्वारे २००३ मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आता स्टार प्लसवरील आगामी शो दिल संभल जा जराद्वारे संजय छोट्‌या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. संजय देखील त्याच्या भावाप्रमाणे प्रचंड फिट आहे. आपल्या फिटनेसबद्दल बोलताना संजय कपूर सांगतो, मी या वयातही वर्कआऊट करतो. मी काही अंशी अनिल पेक्षा अधिक फिट आहे.

अनिल कपूर आणि संजय कपूर हे दोघेही बंधू फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहेत. आपल्या एका मुलाखतीमध्ये संजय म्हणाला होता की, त्याचा फिटनेसवर विश्वास आहे आणि फिटनेस क्रेझ या इंडस्ट्रीत यायच्या कित्येक वर्षं आधीपासूनच तो नियमित व्यायाम करत आहे. तो सांगतो, “मी अगदी तरूणपणापासूनच फिट राहण्यासाठी योग्य आहार घेतो. मला जमेल तेवढे जंक फूड मी टाळतो आणि हा मंत्र सर्वांनी आत्मसाद केला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो. अनिल पण जंक फूड टाळण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याचेही चीट डेज असतात. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, मी त्याच्यापेक्षा जास्त फिट आहे.”

संजय कपूर स्टार प्लसवरील आगामी शो दिल संभल जा जरा मध्ये दिसून येणार असून या मालिकेसाठी तो विक्रम भट्टसोबत अनेक वर्षांनंतर काम करणार आहेत. ह्या शोमध्ये निकी वालिया आणि स्मृती कालरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

संजय कपूरने राजा, प्रेम, औजार, डरना मना है, एलओसी कारगिल, शानदार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या त्याच्या अभी नही तो कभी नही या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.